Home Breaking News “विकसित पिंपरी-चिंचवडचा संकल्प: भाजपचा जाहीरनामा शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते प्रसिद्ध”

“विकसित पिंपरी-चिंचवडचा संकल्प: भाजपचा जाहीरनामा शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते प्रसिद्ध”

पिंपरी–चिंचवड – “विकसित भारत” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी गेल्या १२ वर्षांपासून केंद्र सरकारने दमदार वाटचाल केली आहे. त्याच धर्तीवर “विकसित महाराष्ट्र” घडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर “विकसित पिंपरी-चिंचवड” या ध्येयाने प्रेरित होऊन भाजपने शहरासाठी पुढील पाच वर्षांचा भक्कम आणि दूरदर्शी संकल्पनामा सादर केला आहे.
हा संकल्पनामा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते आणि पिंपरी-चिंचवड निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांच्या उपस्थितीत नवी सांगवी येथे प्रकाशित करण्यात आला. यानिमित्त आयोजित प्रचार सभेत प्रभाग क्रमांक २९, ३१ आणि ३२ मधील भाजपा व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या उमेदवारांच्या प्रचारालाही गती मिळाली.
संकल्पनाम्यामध्ये पिंपरी–चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाचा विस्तृत आराखडा मांडण्यात आला आहे. मेट्रो, इलेक्ट्रिक बसेस, रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरण संरक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये शहराने घेतलेली झेप अधोरेखित करत पुढील टप्प्यात शहराला जागतिक दर्जाचे महानगर बनविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
मेट्रोचा विस्तार निगडीपर्यंत, तसेच भक्तीशक्ती ते चाकण असा ४२ किलोमीटरचा मार्ग सुरू करण्याचा संकल्प आहे. कोचीच्या धर्तीवर पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांमध्ये मेट्रो सुरू करण्याची व्यवहार्यता तपासण्यात येणार आहे. पुढील चार वर्षांत पीएमपीएमएलच्या ताफ्यात चार हजार इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट करून पर्यावरणपूरक आणि सुरक्षित प्रवासाची हमी देण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी रिंगरोड, एलिव्हेटेड कॉरिडॉर, फास्ट कनेक्टर लिंक आणि औद्योगिक भागांना रहिवासी क्षेत्रांशी जोडणारे जलद मार्ग विकसित केले जाणार आहेत. शहरातील रस्ते जागतिक दर्जाचे करण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने ५०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. झोपडपट्टीमुक्त शहर, फ्रि होल्ड धोरण, घरांचे हस्तांतर शुल्क रद्द करणे, तसेच अनधिकृत बांधकामांना आळा घालणे यावरही भर देण्यात आला आहे.
आरोग्य क्षेत्रात दरवर्षी ३० वर्षांवरील सर्व नागरिकांची मोफत तपासणी, थेरगाव येथे कर्करोग रुग्णालय, नद्यांचे पुनरुज्जीवन, नवीन एसटीपी प्रकल्प, ३३ टक्के हरित क्षेत्र, तळवडे येथे जैवविविधता उद्यान, तसेच कामगारांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी मोशी येथे आशियातील सर्वात मोठे एक्झिबिशन व कन्व्हेन्शन सेंटर, इनक्युबेशन सेंटर आणि डेटा सेंटर उभारण्याची योजना आहे. तसेच टाटा समूहाच्या योगदानाच्या सन्मानार्थ दिवंगत रतन टाटा यांचे स्मारक उभारण्याचाही संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. “पिंपरी–चिंचवडच्या समृद्ध, सुरक्षित आणि सुविधासंपन्न भविष्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शहराला देशातील अग्रगण्य महानगर बनविण्याचा आमचा निर्धार आहे,” असा विश्वास भाजपच्या या संकल्पनाम्यामध्ये व्यक्त करण्यात आला आहे.