Home Breaking News शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर उभं शहर पुन्हा सुवर्णकाळाकडे; राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचारमुक्त विकासाचा निर्धार

शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर उभं शहर पुन्हा सुवर्णकाळाकडे; राष्ट्रवादी काँग्रेसचा भ्रष्टाचारमुक्त विकासाचा निर्धार

पिंपरी-चिंचवड हे शहर शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर, जात-धर्माच्या पलीकडे जाऊन, धर्मनिरपेक्ष मूल्यांवर उभं राहिलं आहे. गेल्या २५ वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसवर एकही भ्रष्टाचाराचा ठोस आरोप सिद्ध झालेला नाही. उलट, जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना (JNNURM) यांसारख्या महत्त्वाच्या योजनांतून हजारो कोटी रुपयांचा निधी शहरासाठी आणून पिंपरी-चिंचवडला आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेची ओळख मिळवून देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोलाचा वाटा आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक ७ मधील अधिकृत उमेदवार श्री. विराज विश्वनाथ लांडे, प्रभाग ७ (ब) मधील श्रीम. अनुराधा सुशील लांडगे, प्रभाग ७ (क) मधील श्रीम. अश्विनीताई निलेश फुगे, प्रभाग ७ (ड) मधील श्री. अमोल मधुकर डोळस यांच्या प्रचार सभेत उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना संबोधित करताना शहराच्या बदललेल्या वास्तवावर परखड भाष्य करण्यात आले.
डॉ. मनमोहन सिंह यांच्या काळात आणि महापौर श्री. योगेश बहल यांच्या कार्यकाळात पिंपरी-चिंचवडला ‘बेस्ट सिटी’चा पुरस्कार मिळाला होता. आज मात्र परिस्थिती चिंताजनक आहे. शहराच्या ठेवी कमी झाल्या, कर्जरोखे काढले गेले आणि महानगरपालिका कर्जबाजारी झाली. पाणीटंचाई, कचरा व्यवस्थेचा बोजवारा, रस्त्यांची दुरवस्था, एसआरए योजनेतील भ्रष्टाचार, टँकर माफिया, बोगस कामे आणि फुगवलेली बिले यामुळे शहराची ओळख धूसर होत चालली आहे.
७० लाखांचा पादचारी पूल ७ कोटींना कसा गेला? १२ कोटींचे सॉफ्टवेअर १२० कोटींना कोणी घेतले? ६६६ कोटींचे ९५० सीसीटीव्ही कॅमेरे बसवूनही ७० टक्के बंद का आहेत? ४२ कोटींचा ई-लर्निंग प्रकल्प का थांबला? ७ कोटी खर्च करूनही एकही झाड प्रत्यक्षात का दिसत नाही? या प्रश्नांची उत्तरे आजवर कुणी दिलेली नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही कॉन्ट्रॅक्टर, टँकर माफिया किंवा महानगरपालिका लुटणारे उमेदवार दिले नाहीत. शिक्षित, प्रामाणिक, महिलांचे सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, सुरक्षितता आणि स्वावलंबनासाठी झटणारे उमेदवार पक्षाने उभे केले आहेत. गेल्या तीन वर्षांतील भ्रष्टाचार संपवण्यासाठी घड्याळासमोरील बटण दाबून आमच्या कार्यक्षम उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले.
प्रत्येक घरात नळाद्वारे पुरेसं पाणी, खड्डेमुक्त रस्ते, वाहतूक कोंडीमुक्त शहर, ‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये देशात अव्वल स्थान, हायटेक आरोग्य सुविधा आणि PCMC मॉडेल शाळा – हे सारे स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्यक्षात उतरवणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांसाठी मेट्रो व PMPML बस सेवा मोफत करण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला आहे. यामुळे प्रदूषण कमी होईल, कारण दोन्ही शहरांत मिळून सुमारे ५३ लाख वाहनांची नोंद आहे.
५०० चौरस फुटांपर्यंतची घरं पूर्णतः मालमत्ता करमुक्त केली जातील. विद्यार्थ्यांना डेटा प्लॅनसह मोफत टॅब देण्यात येतील. रोजगाराभिमुख प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना स्वयंरोजगारासाठी व व्यवसाय विस्तारासाठी ५ लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज दिलं जाईल. अण्णासाहेब मगर स्टेडियमचा पुनर्विकास करून भारतातील आधुनिक, ऑलिम्पिक दर्जाचं स्टेडियम उभारण्याची ग्वाहीही देण्यात आली. शहराचा हरवलेला गौरव पुन्हा मिळवण्यासाठी, पिंपरी-चिंचवडला भ्रष्टाचारमुक्त, स्वच्छ, सुरक्षित आणि समृद्ध बनवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज आहे.