सोमनाथ : “सोमनाथ स्वाभिमान पर्व हा कोट्यवधी भारतीयांच्या शाश्वत आस्था, साधना आणि अटूट संकल्पाचा जीवंत प्रतिबिंब आहे. पवित्र श्री सोमनाथ मंदिरात या महापर्वाचा सहभागी होणे हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय आणि अमूल्य क्षण आहे,” असे भावनिक शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या पावन प्रसंगी त्यांनी श्री सोमनाथ मंदिरात देशातील १४० कोटी नागरिकांच्या समृद्धी, शांतता आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. “सोमनाथ मंदिरात प्रार्थना करताना मन अत्यंत नम्र झाले. ही अनुभूती शब्दांत मांडणे कठीण आहे,” असे त्यांनी नमूद केले.
सोमनाथ हे केवळ एक मंदिर नसून, भारताच्या सांस्कृतिक वारशाचे, आत्मगौरवाचे आणि पुनरुत्थानाचे प्रतीक आहे. अनेक आक्रमणांनंतरही पुन्हा पुन्हा उभे राहणारे हे मंदिर भारताच्या अडिग आत्म्याचे दर्शन घडवते. ‘स्वाभिमान पर्व’च्या माध्यमातून देशवासीयांमध्ये इतिहासाची जाणीव, संस्कृतीचा अभिमान आणि राष्ट्रासाठी समर्पणाची भावना अधिक दृढ होत आहे.
या महापर्वामुळे तरुण पिढीला आपल्या परंपरेशी जोडण्याची प्रेरणा मिळत असून, भारताच्या गौरवशाली इतिहासाचा संदेश जगभर पोहोचत आहे. श्रद्धा, संस्कार आणि राष्ट्रभावना यांचे अद्भुत संमेलन म्हणजेच ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ असल्याचे चित्र यावेळी दिसून आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमुळे या पर्वाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, देशभरातून आलेल्या भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. “सोमनाथ हे भारताच्या आत्म्याचे प्रतीक आहे आणि या पवित्र स्थळी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करणे हा माझ्यासाठी सन्मान आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.