पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कामांमध्ये भ्रष्टाचार, निविदांतील रिंग, रस्ते कामांतील गैरप्रकार, कुत्र्यांच्या नसबंदीतील घोटाळे, डांबरी रस्त्यावर सिमेंट टाकण्यासारखे प्रकार, लाचप्रकरणात स्थायी समिती अध्यक्षाची अटक, कोयता गॅंगचा उच्छाद – अशा अनेक गंभीर घटना शहरात घडल्या आहेत. या सत्ताधाऱ्यांच्या राजवटीवर बोट ठेवण्याऐवजी, यात सुधारणा घडवून आणण्यासाठी “शहरातील कारभारी बदला” असे स्पष्ट आणि ठाम आवाहन शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी-चिंचवडकरांना केले.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी किवळे येथील मुकाई चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. मोबाईल व्हिडिओ कॉलिंगद्वारे त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, उपनेते इरफान सय्यद, सुलभा उबाळे, महानगरप्रमुख राजेश वाबळे, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख विश्नजीत बारणे, जिल्हा संघटक बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख नीलेश तरस, जिल्हा संघटिका शिला भोंडवे, रुपेश कदम, सायली साळवे, माऊली जगताप यांच्यासह हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “महाराष्ट्राच्या प्रगतीला गती देणारे शहर म्हणजे पिंपरी-चिंचवड. शिवसेना विकासाचा ठोस अजेंडा घेऊन निवडणुकीला सामोरी जात आहे. शहरात बदल, परिवर्तन घडविण्याची वेळ आली आहे. इतिहास टक्कर देणाऱ्यांचाच लिहिला जातो, तडजोड करणाऱ्यांचा नाही. त्यामुळे कोणालाही घाबरू नका, बिनधास्त लढा.”
ते पुढे म्हणाले, “गेल्या तीन वर्षांपासून माझ्यावर सातत्याने टीका होत आहे, शिव्याशाप दिले जात आहेत. पण सत्याला त्रास होतो, सत्य कधीही पराभूत होत नाही. हाल होतील, पण हार होणार नाही. शिवसेना स्वबळावर लढत आहे, तिला कोणीही हलक्यात घेऊ नये.”
शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचे सांगताना त्यांनी माहिती दिली की,
-
सांडपाणी निचऱ्यासाठी ५२ कोटींचा निधी,
-
पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी १५३ कोटींची योजना,
-
पवना जलवाहिनी प्रकल्प राबविण्यात येणार,
-
नागरिकांना दररोज पाणीपुरवठा केला जाणार,
-
पवना-मुळा-इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प मार्गी लावला जाणार,
-
समाविष्ट भागातील अर्धवट डीपी रस्ते पूर्ण केले जाणार,
-
चुकीचा डीपी दुरुस्त केला जाणार,
-
वाकड-हिंजवडी वाहतूक कोंडी सोडविण्यात येणार,
-
चापेकर स्मारकासाठी ६८ कोटींचा आराखडा मंजूर करून त्यातील १३ कोटी वर्ग करण्यात आले आहेत.





