पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७ (१) व (३) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून संपूर्ण पुणे ग्रामीण जिल्ह्यात २२ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे.
या आदेशानुसार, जिल्ह्यात कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ बाळगणे, दगड, शस्त्रे, अस्खे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे जवळ बाळगणे यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येणारी कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास प्रतिबंध आहे.
याशिवाय, कोणत्याही व्यक्तीचे प्रतिकात्मक प्रेत, पुढाऱ्यांचे फोटो अथवा प्रतिमा यांचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे, सभ्यता व नीतिमत्तेला धोका पोहोचविणारे कृत्य करणे, तसेच राज्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल किंवा जनतेला भडकवणारी आवेशपूर्ण भाषणे करणे यांनाही मनाई करण्यात आली आहे. समाजात अस्थिरता निर्माण करणारे साहित्य तयार करणे किंवा त्याचा प्रसार करणे हेही या आदेशान्वये गुन्हा ठरेल.
कलम ३७ (३) अन्वये पाचपेक्षा अधिक लोकांचा जमाव करण्यास बंदी घालण्यात आली असून, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतीही सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे प्रतिबंधित राहणार आहे. या आदेशामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
हा आदेश शासन सेवेत असलेल्या व ज्यांना कर्तव्य बजावण्यासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी आहे अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. मात्र, सर्वसामान्य नागरिकांनी या आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम १३५ अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. आगामी काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित व्हावी यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.