Home Breaking News परिवहन वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू

परिवहन वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू

27
0
पुणे :- प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे मालवाहतूक, टुरिस्ट टॅक्सी, बस तसेच अॅम्ब्युलन्स या परिवहन संवर्गातील वाहनांसाठी नवीन नोंदणी मालिका सुरू करण्यात येत आहे. या नव्या मालिकेमुळे वाहनधारकांना त्यांच्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
ज्या वाहनधारकांना खास व लक्षवेधी नोंदणी क्रमांक हवा आहे, त्यांनी विहित शुल्क (तीनपट किंवा नियमित शुल्क) भरून अर्ज करावा. यासाठी 13 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2.30 या वेळेत डिमांड ड्राफ्ट (DD), पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र व पॅनकार्डच्या साक्षांकित प्रती जोडून अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
एखाद्या विशिष्ट क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास, अशा अर्जदारांची यादी 14 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. त्याच दिवशी दुपारी 4.30 वाजता संबंधित क्रमांकांसाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या लिलावात अर्जदारांना सहभागी होता येईल.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी स्पष्ट केले आहे की एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. तसेच राखीव क्रमांक मिळाल्यानंतर 180 दिवसांच्या आत वाहन नोंदणीसाठी सादर न केल्यास तो क्रमांक आपोआप रद्द होईल आणि भरलेली फी शासन खात्यात जमा होईल. कोणत्याही परिस्थितीत राखीव नोंदणी क्रमांकाकरिता भरलेली रक्कम परत मिळणार नाही किंवा तिचे कोणतेही समायोजन करता येणार नाही. वाहनधारकांनी दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पारदर्शक असून सर्वांसाठी समान संधी उपलब्ध करून देणारी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.