पुणे शहरात अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला असून, गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक ०२ ने चंदननगर परिसरात मोठी कारवाई करत २५ लाख रुपये किमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ हे प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार संदिप देवकाते यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली. वडगाव शेरी रोडवरील सोपान नगर परिसरात, योगी आईस्क्रीम फॅक्टरी शेजारील फार्महाऊसमध्ये मोठ्या प्रमाणावर मॅफेड्रॉन विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने तात्काळ सापळा रचला.
या कारवाईत रतननाथ मोहननाथ योगी (वय ४२), रा. सोपान नगर, वडगाव शेरी, पुणे (मूळ रहिवासी राजस्थान) याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या ताब्यातून १२० ग्रॅम ७९ मिलीग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.), ज्याची किंमत सुमारे २५ लाख रुपये, तसेच इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, अँड्रॉइड मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ११/२०२६ नुसार एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २१ (क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून आणखी काही साखळी उघडकीस येण्याची शक्यता असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे आणि मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अंमली पदार्थ विरोधी पथक ०२ चे पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड तसेच पोलीस अंमलदार राजस शेख, संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, सुनील महाडीक, गणेश गोसावी, अमोल जगताप, संदिप देवकाते, दिनेश बास्टेवाड, महेश बोराडे व शुभांगी म्हाळसेकर यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली. पुणे शहरात अंमली पदार्थांचा फैलाव रोखण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.