Home Breaking News पुणे शहरात रस्ता सुरक्षा अभियान–२०२६ चे आयोजन; वाहतूक जनजागृतीसाठी पोलिसांचा पुढाकार

पुणे शहरात रस्ता सुरक्षा अभियान–२०२६ चे आयोजन; वाहतूक जनजागृतीसाठी पोलिसांचा पुढाकार

43
0
पुणे शहरात सुरक्षित व सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने पुणे शहर वाहतूक विभागातर्फे “रस्ता सुरक्षा अभियान – २०२६ व मुद्देमाल वितरण समारंभ” भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे.
पुणे शहर पोलीस उपायुक्त (वाहतूक) यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास शहरातील मान्यवर पोलीस अधिकारी, सामाजिक संस्था प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने घेतलेल्या उपाययोजना, नागरिकांचे सहकार्य आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून पोलीस सह आयुक्त श्री. रंजन कुमार शर्मा हे सन्माननीय उपस्थित राहणार आहेत. तसेच अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, PPCR चे प्रमुख समन्वयक श्री. सुधीर मेहता आणि TMCF चे कार्यकारी संचालक श्री. अजय अग्रवाल हे विशेष उपस्थिती म्हणून कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
या वेळी रस्ता सुरक्षेसाठी योगदान देणाऱ्या घटकांना मुद्देमाल वितरण करण्यात येणार असून, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून अपघातमुक्त पुणे घडवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वाढती वाहतूक, अपघातांचे प्रमाण आणि शिस्तबद्ध वाहतुकीची गरज लक्षात घेता हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
हा कार्यक्रम दि. ०८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता, सिम्बॉयसिस कॉलेज (SVC ऑडिटोरियम) येथे आयोजित करण्यात आला असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.