Home Breaking News सोनं पॉलिशच्या बहाण्याने लुट करणारी परराज्यातील टोळी जेरबंद; पर्वती पोलिसांची शिताफीने कारवाई,...

सोनं पॉलिशच्या बहाण्याने लुट करणारी परराज्यातील टोळी जेरबंद; पर्वती पोलिसांची शिताफीने कारवाई, २.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

32
0
पुणे शहरात नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांवर पर्वती पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई करत सोनं–चांदी पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने लूट करणारी परराज्यातील टोळी पकडली आहे. या कारवाईत २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे लगड व पॉलिशचे साहित्य असा सुमारे २ लाख ५० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी दांडेकर पुल परिसरात जय महाराष्ट्र मित्र मंडळाजवळील चारभुजा दुकानाच्या शेजारी फिर्यादीकडे असलेल्या सोन्याच्या बांगड्या पॉलिश करून देतो असा बहाणा करून दोन अज्ञात इसमांनी विश्वास संपादन केला. त्यानंतर हातचलाखीने सोन्याच्या दोन बांगड्या लंपास करून आरोपी पसार झाले. या प्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४०२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सौ. अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत परराज्यातून आलेल्या टोळीला तळगाव दाभाडे परिसरातून शिताफीने अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये
  1. शिवकुमार विनोद साह (वय २१)
  2. प्रितमकुमार सुशिल साह (वय २३)
  3. गोविंद सुशील साह (वय २९)
  4. मदन गंगा भगत (वय २३)
  5. राजा रामबारानी यादव (वय ३२)
    (सर्व मूळ रहिवासी – भागलपूर, बिहार; सध्या राहणार – तळगाव दाभाडे, पुणे) यांचा समावेश आहे.
आरोपींच्या ताब्यातून २० ग्रॅम सोन्याची लगड, तसेच पॉलिश करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या टोळीने यापूर्वीही अशाच प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत असून, पुढील तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०२ श्री. मिलिंद मोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग श्री. धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पोलीस उपनिरीक्षक किरण पवार, इसराईल शेख यांच्यासह पोलीस अंमलदार व पोलीस मित्रांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. पुणे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोनं–चांदी पॉलिश, दागिने स्वच्छ करून देतो अशा अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये आणि संशयास्पद प्रकार तात्काळ पोलिसांना कळवावा.