Home Breaking News लातूरचा सर्वांगीण विकास हाच आमचा संकल्प; महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ६१ उमेदवारांसह...

लातूरचा सर्वांगीण विकास हाच आमचा संकल्प; महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ६१ उमेदवारांसह मैदानात – सभेत ठाम निर्धार

25
0
लातूर ही धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपणारी मराठवाड्याची महत्त्वाची भूमी आहे. डाळी, तेलबिया आणि धान्य व्यापारामुळे लातूरची ओळख देशभरात एक सक्षम व्यापारी केंद्र म्हणून आहे. अशा या लातूर भूमीत ग्रामदैवत सिद्धेश्वर-रत्नेश्वर, हजरत सुरज शहा वली आणि राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना नमन करून लातूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ निमित्त आयोजित भव्य सभेत उपस्थितांना संबोधित करण्यात आले.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव–शाहू–फुले–आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या पक्षात जातीभेद, मनभेदाला स्थान नसून समाजातील प्रत्येक घटक हा आमच्या परिवाराचा भाग आहे, या भावनेतून राष्ट्रवादी काँग्रेस राजकारण करते. याच विचारातून लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ५६ अधिकृत उमेदवार आणि ५ पुरस्कृत उमेदवार असे एकूण ६१ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहेत.
लातूरकरांनी आजवर अनेक पक्षांना संधी दिली; मात्र पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न, स्वच्छतेचा अभाव, वाहतूक कोंडी आणि मूलभूत नागरी समस्यांचा डोंगर अजूनही कायम आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली. जकात, एलबीटी आणि आता जीएसटीमुळे महानगरपालिकांच्या उत्पन्नात मोठी घट झाली असून याचा सर्वाधिक फटका लातूर शहराला बसला आहे. इचलकरंजी महापालिकेसोबत झालेला अन्याय जसा कॅबिनेटमध्ये दुरुस्त केला, तसाच न्याय लातूरलाही मिळवून दिला जाईल, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला. जीएसटीचा वाढीव हिस्सा मिळवून देण्याची जबाबदारी स्वतः घेणार असल्याचेही सभेत स्पष्ट करण्यात आले. शहरातील स्वच्छता, कायदा-सुव्यवस्था, पर्यावरण संरक्षण आणि मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी शासनस्तरावर ठोस निर्णय घेतले जातील. या निवडणुकीत तरुण, सुशिक्षित आणि दूरदृष्टी असलेल्या उमेदवारांना संधी देण्यात आली असून परदेशातून शिक्षण घेतलेली तरुण बॅरिस्टरही राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवार आहे, हे लातूरच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशादायक असल्याचे मत व्यक्त झाले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत २५ वर्षे काम करताना रस्ते, पाणीपुरवठा, उद्यानं, क्रीडांगणं आणि मजबूत पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या. हाच विकासाचा मॉडेल लातूरमध्ये राबवण्याची ताकद आणि इच्छाशक्ती राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांची ओळख पुसून टाकण्याची भाषा करणाऱ्यांचा तीव्र निषेध करण्यात आला. विलासराव देशमुख यांचे महाराष्ट्रासाठीचे योगदान कधीही विसरता येणार नाही, हे ठामपणे सांगण्यात आले.
संविधानामुळे श्रीमंत उद्योगपती आणि शेवटच्या लाडक्या बहिणीचे मत समान आहे, हाच लोकशाहीचा आत्मा असल्याचे सांगत समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांना राज्य कदापि सहन करणार नाही, असा इशाराही देण्यात आला. क्रीडा मंत्री असताना संजय बनसोडे यांनी लातूर विभागीय क्रीडा संकुलासाठी ७५ कोटींचा निधी दिला, तर बाबासाहेब पाटील यांच्या माध्यमातून २५ कोटींचे सहकार भवन मंजूर झाले, ही लातूरच्या विकासाची ठळक उदाहरणे असल्याचे नमूद करण्यात आले.
शहराच्या बाहेर साचलेला कचरा, वाहतुकीचा बोजवारा, व्यापारी आणि महिलांच्या सुरक्षिततेचे प्रश्न गांभीर्याने हाताळले जातील. दफनभूमी, स्मशानभूमी, भाजी मंडई, सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाईल. अल्पसंख्याक समाजासाठी अधिक निधी, जीएसटी अनुदान, वाढीव मालमत्ता कर आणि सुप्रीम कोर्टात प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याची जबाबदारीही स्वीकारली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
लाडकी बहिण योजना, एआय आधारित शेती, यूपीएससी-एमपीएससी प्रशिक्षण केंद्र, डिजिटल शाळा, अभ्यासिका, एआय ट्रेनिंग, एसटीपी प्रकल्प आणि ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून लातूरला आधुनिक, स्मार्ट शहर बनवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मुस्लिम, ओबीसी, लिंगायत, मागासवर्गीय, मराठा, आदिवासी, मारवाडी अशा सर्व समाजांना राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिनिधित्व दिले असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. शेवटी गुन्हेगारी, विकृत प्रवृत्ती आणि कायदा हातात घेणाऱ्यांना कठोरपणे आवर घातला जाईल, असे सांगत येत्या १५ जानेवारी रोजी घड्याळाच्या चिन्हावर मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.