Home Breaking News कष्टकऱ्यांचे बुलंद नेतृत्व डॉ. बाबा कांबळे यांचा भाजपाला जाहीर पाठिंबा, आमदार महेश...

कष्टकऱ्यांचे बुलंद नेतृत्व डॉ. बाबा कांबळे यांचा भाजपाला जाहीर पाठिंबा, आमदार महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली ‘मिशन PCMC’ला नवे बळ

33
0
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकीय विश्वात खळबळ उडवणारी आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने निर्णायक ठरणारी मोठी घडामोड समोर आली आहे. कष्टकरी, रिक्षा चालक, असंघटित कामगार आणि बहुजन वर्गाचे बुलंद व लढाऊ नेतृत्व म्हणून ओळख असलेले डॉ. बाबा कांबळे यांनी भारतीय जनता पक्षाला जाहीर पाठिंबा देत आमदार महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त केला आहे. २०२६ च्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पाठिंबा शहराच्या राजकारणातील समीकरणे बदलणारा ठरू शकतो.
पिंपरी येथे आयोजित जाहीर सभेत डॉ. बाबा कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. “कष्टकऱ्यांचे स्वतंत्र, निर्भीड आणि संघर्षशील नेतृत्व अजित पवारांना नको आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला. “२५ वर्षे आम्ही राष्ट्रवादीला प्रामाणिक साथ दिली, पण कष्टकऱ्यांना प्रतिनिधित्व दिले गेले नाही. उलट आम्हाला बाजूला सारण्याचे कट रचले गेले,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
डॉ. कांबळे पुढे म्हणाले की, कष्टकरी, रिक्षा चालक व असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी लढा देताना जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करण्यात आले. एका टप्प्यावर “प्रस्थापित नेत्याच्या मुलासाठी” आपला राजकीय बळी देण्याचा प्रयत्न झाला आणि चारही बाजूंनी कोंडी करण्यात आली. मात्र, अशा कठीण काळात आमदार महेश दादा लांडगे यांनी कोणतीही राजकीय गणिते न पाहता कष्टकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत खऱ्या अर्थाने मदतीचा हात पुढे केला, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या सभेत डॉ. बाबा कांबळे यांनी मोठे आणि स्पष्ट राजकीय आवाहन करत सांगितले की, “पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ७ लाख रिक्षा चालक, कामगार व कष्टकरी संघटनांचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही उमेदवाराला मतदान करणार नाहीत.” हे आवाहन केवळ घोषणात्मक नसून, शहरातील राजकारणाला दिशा बदलणारे ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
विशेष बाब म्हणजे, याच कालावधीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी-चिंचवड शहराचा दौरा नियोजित होता आणि डॉ. बाबा कांबळे यांच्याशी संवादाचाही कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र, कांबळे यांनी तो कार्यक्रम टाळत थेट भाजपाचे व्यासपीठ गाठले आणि भाजपाला जाहीर पाठिंबा दिला. यामुळे शहरातील स्थानिक नेतृत्व एकवटत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
शहरातील बहुजन, वंचित, कामगार आणि कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व एकत्र येत असल्याने ‘मिशन PCMC’ अंतर्गत आमदार महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्वात नवे आणि मजबूत राजकीय समीकरण आकाराला येत आहे. “कष्टकऱ्यांच्या लढ्यात जे नेते प्रामाणिकपणे आणि निर्भीडपणे साथ देतात, त्यांनाच जनतेचा खरा आशीर्वाद मिळतो,” असा ठाम विश्वास व्यक्त करत डॉ. बाबा कांबळे यांनी आगामी काळात ही ताकद अधिक संघटितपणे आणि आक्रमकपणे काम करेल, असे स्पष्ट केले.
आमदार महेश दादा लांडगे आणि डॉ. बाबा कांबळे यांच्या ‘दादा–बाबा’ जोडीमुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठा बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, महापालिका निवडणुकीत याचे पडसाद उमटतील, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.
“कष्टकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही कितीही अडचणी आल्या तरी मागे हटणार नाही. जेव्हा नेता खऱ्या अर्थाने कष्टकऱ्यांच्या पाठीशी उभा राहतो, तेव्हा आम्हीही त्याच्यासोबत ठामपणे उभे राहतो. पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक रिक्षाचालक, कामगार आणि असंघटित कामगाराचा आवाज ऐकला जाईल, त्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही लढू आणि न्याय मिळवून देऊ. राजकारण आमच्या सत्तेसाठी नाही, तर कष्टकऱ्यांच्या सन्मान, सुरक्षा आणि भविष्याच्या सुरक्षिततेसाठी आहे,” असे भावनिक शब्दांत डॉ. बाबा कांबळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.