Home Breaking News “पुणेकरांचा अधिकारनामा” सादर, ‘पुणे फर्स्ट’च्या भूमिकेतून काँग्रेसचा विकासाचा ठाम संकल्प

“पुणेकरांचा अधिकारनामा” सादर, ‘पुणे फर्स्ट’च्या भूमिकेतून काँग्रेसचा विकासाचा ठाम संकल्प

पुणे :- आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आज एक महत्त्वपूर्ण आणि दिशादर्शक दस्तऐवज सादर करण्यात आला. “पुणेकरांचा अधिकारनामा” या नावाने ओळखला जाणारा हा जाहीरनामा पुणेकरांच्या मूलभूत अधिकारांवर, विकासावर आणि सन्मानावर केंद्रित असून “पुणे फर्स्ट” या भूमिकेतून प्रत्येक पुणेकराला सुरक्षित, आरोग्यदायी, समावेशक आणि आनंदी — जागतिक दर्जाचे शहर अनुभवता यावे, हा काँग्रेसचा ठाम संकल्प यातून मांडण्यात आला आहे.
या अधिकारनाम्यात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि लोकाभिमुख धोरणे मांडण्यात आली असून नागरिकांचे आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, वाहतूक, पाणीपुरवठा, पर्यावरण संरक्षण, महिला व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता, युवकांसाठी रोजगार संधी आणि स्मार्ट नागरी सुविधा या मुद्द्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. पुण्याचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा जपत आधुनिकतेकडे नेण्याचा स्पष्ट रोडमॅप या अधिकारनाम्यात अधोरेखित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास माजी मंत्री श्री. सतेज पाटील, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष श्री. अरविंद शिंदे, माजी आमदार श्री. मोहन जोशी, माजी मंत्री श्री. रमेश बागवे, पुण्याचे माजी महापौर श्री. प्रशांत जगताप, श्री. अभय छाजेड, श्री. अजित दरेकर, श्री. मेहबूब शेख, माजी आमदार सौ. दिप्ती चौधरी यांच्यासह शहर व राज्य पातळीवरील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, पुणे हे केवळ आयटी, शिक्षण आणि उद्योगाचे केंद्र नसून संस्कृती, सामाजिक सलोखा आणि लोकशाही मूल्यांची परंपरा जपणारे शहर आहे. मात्र गेल्या काही वर्षांत नियोजनाचा अभाव, वाढते प्रदूषण, वाहतुकीची कोंडी, मूलभूत सुविधांतील त्रुटी आणि नागरी प्रश्नांमुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा “पुणेकरांचा अधिकारनामा” हा केवळ निवडणुकीपुरता जाहीरनामा नसून, पुणेकरांच्या रोजच्या आयुष्याशी थेट जोडलेला विकासाचा करार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
“पुणे फर्स्ट” या भूमिकेतून काँग्रेस पुणेकरांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणार असून, स्वच्छ व आरोग्यदायी वातावरण, दर्जेदार सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, विश्वासार्ह पाणीपुरवठा, किफायतशीर व सुरळीत सार्वजनिक वाहतूक, हिरवळींचे संरक्षण आणि पारदर्शक प्रशासन या मुद्द्यांवर ठोस अंमलबजावणी केली जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
काँग्रेस पक्ष पुणेकरांचा विकास, सन्मान आणि हक्क यासाठी सातत्याने रस्त्यावर उतरून, सभागृहात आणि प्रशासनाच्या माध्यमातून लढा देत राहील. पुणेकरांच्या अपेक्षा, आकांक्षा आणि भविष्य लक्षात घेऊन तयार केलेला “पुणेकरांचा अधिकारनामा” आगामी महानगरपालिका निवडणुकीत शहराच्या राजकारणाला नवी दिशा देईल, असा दावा पक्षनेत्यांनी केला आहे.