Home Breaking News बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ : वॉर्ड ११२ मध्ये महायुतीच्या उमेदवार साक्षी दळवी...

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ : वॉर्ड ११२ मध्ये महायुतीच्या उमेदवार साक्षी दळवी यांच्या समर्थनार्थ नागरिकांशी संवाद

34
0
मुंबई | भांडुप पश्चिम : आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भांडुप पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक ११२ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच अनुषंगाने भाजप–शिवसेना–आरपीआय महायुतीच्या अधिकृत उमेदवार साक्षी दळवी यांच्या समर्थनार्थ ड्रीम्स सोसायटी येथे स्थानिक रहिवाशांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेण्यात आल्या.
या संवाद बैठकीदरम्यान पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, वाहतूक कोंडी, पार्किंग तसेच सुरक्षेचे प्रश्न यांसारख्या मूलभूत नागरी सुविधांवर सविस्तर चर्चा झाली. महायुतीच्या माध्यमातून वॉर्ड ११२ मध्ये पारदर्शक, गतिमान आणि विकासाभिमुख प्रशासन देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री. दीपक दळवी, श्रीधर देशपांडे, महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच ड्रीम्स सोसायटीतील मोठ्या संख्येने रहिवासी उपस्थित होते. उपस्थित नेत्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध लोकहिताच्या योजनांची माहिती देत, त्याचा थेट लाभ स्थानिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
स्थानिक रहिवाशांनीही आपल्या परिसराच्या विकासासाठी महायुतीकडून सकारात्मक अपेक्षा व्यक्त करत, वॉर्डचा सर्वांगीण विकास, सुरक्षितता आणि जीवनमान उंचावण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, असा विश्वास व्यक्त केला. येणाऱ्या काळात अशाच प्रकारे घरोघरी संपर्क, बैठका आणि संवाद कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रचार अधिक तीव्र केला जाणार असल्याचे संकेत देण्यात आले.