पिंपरी-चिंचवड : येऊ घातलेल्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ मध्ये ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधण्याची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. उमेश गणेश काटे, श्रीम. शीतल विठ्ठल काटे, श्रीम. मीनाक्षी अनिल काटे आणि श्री. विठ्ठल उर्फ नाना कृष्णाजी काटे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाच्या मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली.
यावेळी उमेदवारांनी सांगितले की, शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्या तुलनेत रस्ते रुंद व प्रशस्त करणे, बहुउद्देशीय सभागृहांची उभारणी, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनुभव आणि नव्या विचारांचा समतोल साधत उमेदवारी देण्यात आली असून, हा निर्णय शहराच्या दीर्घकालीन हिताचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आदरणीय शरद पवार साहेबांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाचा उल्लेख करत, त्यांच्या कार्यकाळात IT पार्कसारख्या महत्त्वाच्या संकल्पना प्रत्यक्षात आल्याचे सांगण्यात आले. पिंपरी-चिंचवड हे ‘मिनी भारत’ असून विविध राज्यांतील नागरिक येथे वास्तव्यास आहेत. मात्र, सध्या शहराला दूरदृष्टी असलेले नेतृत्व कमी पडत असल्याची खंत उमेदवारांनी व्यक्त केली. AI, आधुनिक तंत्रज्ञान, स्मार्ट सिटी संकल्पना, तसेच कृषी व रोजगार क्षेत्रातील नव्या संधींचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
महानगरपालिकेतील कारभारावर तीव्र टीका करताना उमेदवार म्हणाले की, आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भ्रष्टाचारामुळे पोखरली गेली आहे. चुकीच्या लोकांच्या हाती सूत्रे गेल्याने आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ७० टक्क्यांहून अधिक CCTV कॅमेरे बंद आहेत, प्रदूषण झपाट्याने वाढत आहे, हरित क्षेत्र नष्ट होत आहे आणि झाडे जळण्याच्या घटनांमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. याचे गंभीर परिणाम पुढील पिढीला भोगावे लागणार असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
ही निवडणूक कोणत्याही एका व्यक्तीसाठी नसून, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या भवितव्याची निवडणूक आहे, असे ठाम मत उमेदवारांनी मांडले. बदल हवा असेल तर नव्या नेतृत्वाला संधी द्यावी लागते. सर्व घटकांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प करत, ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद व विश्वास अत्यंत महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी, येणाऱ्या १५ जानेवारी रोजी मतदानाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन करत, “मी कुठेही कमी पडणार नाही,” अशी ग्वाही उमेश काटे यांनी नागरिकांना दिली.