कल्याण-डोंबिवली : येऊ घातलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपा महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या जाहीर सभा कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या दोन्ही ठिकाणी पार पडणार असून, महायुतीच्या प्रचाराला यामुळे मोठी ऊर्जा मिळणार आहे.
या सभांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महायुतीच्या विकासात्मक धोरणांवर, राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजनांवर तसेच कल्याण-डोंबिवली शहराच्या भावी विकास आराखड्यावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वाहतूक, आरोग्य आणि स्वच्छता या महत्त्वाच्या विषयांवर ते आपली भूमिका मांडणार असल्याने नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.
महायुती सरकारच्या कार्यकाळात मुंबई महानगर प्रदेशातील विकासाला गती मिळाली असून, कल्याण-डोंबिवली शहरालाही त्याचा मोठा लाभ झाला आहे. आगामी काळात शहराला अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि सुविधा-संपन्न बनवण्यासाठी महायुती कटिबद्ध असल्याचा संदेश या सभांमधून देण्यात येणार आहे.
या जाहीर सभांमध्ये स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महायुतीचे उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, ही सभा निवडणूक प्रचारातील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. त्यामुळे नागरिकांनीही या सभांना उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.