Home Breaking News जेष्ठ नागरिकाची लूट करणारा आरोपी अटकेत; चौकशीत खोपोलीतील माजी नगरसेवकाच्या खुनाची धक्कादायक...

जेष्ठ नागरिकाची लूट करणारा आरोपी अटकेत; चौकशीत खोपोलीतील माजी नगरसेवकाच्या खुनाची धक्कादायक कबुली

35
0

पुणे | प्रतिनिधी — पुणे शहरातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या जेष्ठ नागरिक लूटप्रकरणात मोठा खुलासा झाला असून, या गुन्ह्यातील फरार मुख्य सूत्रधाराला अटक केल्यानंतर त्याने खोपोली येथील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या खुनाची कबुली दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे पुणे आणि रायगड जिल्ह्यातील गुन्हेगारी साखळीवर प्रकाश पडला आहे.

जेष्ठ नागरिकाला निर्जनस्थळी गाठून लूट

दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, हडपसर येथील मधुबन सोसायटी ते हिलसाईड अपार्टमेंट दरम्यानच्या निर्जन रस्त्यावर चार अज्ञात आरोपींनी एका वयोवृद्ध नागरिकास अडवून मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून मोटारसायकलवरून पलायन केले होते.

या घटनेप्रकरणी वयोवृद्ध नागरिकाच्या तक्रारीवरून वानवडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५०६/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), २(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दोन आरोपी अटकेत, मुख्य सूत्रधार फरार

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वानवडी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान
🔹 उमर नुर खान
🔹 साहील हबीब फकीर
या दोघांना अटक करून लुटलेली सोन्याची चैन आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार खालीद खलील कुरेशी हा फरार झाला होता.

हांडेवाडीतून अटक; धक्कादायक कबुली

दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकाने हांडेवाडी, पुणे येथून
खालीद खलील कुरेशी (वय २३, रा. सय्यदनगर, हडपसर)
यास शिताफीने ताब्यात घेतले.

सखोल चौकशीत आरोपीने धक्कादायक कबुली देत सांगितले की, पुण्यातील दोन साथीदारांसह सुपारी घेऊन खोपोली येथील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांचा खून करण्यात आला होता. या कबुलीमुळे जेष्ठ नागरिक लूटप्रकरणातून थेट राजकीय खुनाचा गुन्हा उघडकीस आला आहे.

गुन्हेगारी साखळी उघड; पुढील तपास सुरू

वानवडी पोलिसांनी या आरोपीकडून अधिक गुन्ह्यांची माहिती काढत खोपोली खूनप्रकरणात त्याची भूमिका निष्पन्न केली आहे. पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असून, या प्रकरणात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही उल्लेखनीय कामगिरी
मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील,
मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-५ श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर,
सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्रीमती नम्रता देसाई,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि
पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता जाधव
यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.