पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाकडून सातत्याने कठोर कारवाया केल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-३ ने धडाकेबाज कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे.
दि. ०२/०१/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट-३ कडील अधिकारी व अंमलदार वरिष्ठांच्या आदेशानुसार पर्वती व सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी दांडेकर पूल, दत्तवाडी परिसरात असताना पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे व तुषार किंद्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पुर्वेश ऊर्फ सार्थक दिनेश चव्हाण (वय २२ वर्षे, रा. शुक्रवार पेठ, पुणे) हा इसम अवैधरित्या शस्त्र बाळगत असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली.
त्यानुसार भारत पेट्रोल पंपासमोरील गल्ली, टिळक रोड, पुणे येथे सापळा रचण्यात आला. संशयित इसम थांबलेला असताना शिताफीने कारवाई करत त्याला ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान त्याच्याकडून ०१ गावठी पिस्टल, ०१ खाली मॅगझीन व ०३ जिवंत काडतुसे असा घातक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. ही शस्त्रे बेकायदेशीररीत्या बाळगल्याचे स्पष्ट झाल्याने त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सदर आरोपीला पुढील तपास व कारवाईसाठी खडक पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसण्यास मोठी मदत होणार असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक भक्कमपणे हाताळला जात आहे.
ही संपूर्ण कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे शाखा) श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-१) श्री. विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहा. पोलीस फौजदार पंढरीनाथ शिंदे, मुकुंद तारु तसेच पोलीस अंमलदार अमोल काटकर, नितिन जगदाळे, मोहम्मद शेख, अमित बोडरे, किशोर शिंदे, कैलास लिम्हण, संदीप शेळके, अतुल साठे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे व तुषार किंद्रे यांनी उल्लेखनीय व धाडसी कामगिरी बजावली आहे. पुणे शहर पोलीस दलाकडून भविष्यातही अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असून शहरातील गुन्हेगारीवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.