पुणे :- वर्षअखेर आणि नूतन वर्ष २०२६ च्या स्वागतानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो. मात्र, या कालावधीत काही बेजबाबदार वाहनचालक मद्यप्राशन करून वेगात व धोकादायक पद्धतीने वाहने चालवित असल्याने स्वतःच्या तसेच इतर नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात विशेष आणि कडक मोहिम राबविण्यात आली.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार तसेच पोलीस सह आयुक्त डॉ. राशीकांत महावरकर व अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेमार्फत शहरातील विविध भागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने तपासणी करण्यात आली.
या विशेष मोहिमेअंतर्गत पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या १३ वाहतूक विभागांमार्फत एकूण ४७ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. नाकाबंदी दरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालविणारे २२० दुचाकीस्वार आणि २० चारचाकी वाहनचालक, असे एकूण २४० वाहनचालक आढळून आले. संबंधित सर्व वाहनचालकांविरोधात मा. न्यायालयात “ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह” अंतर्गत खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
वाहतूक पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरात सुरक्षिततेचा संदेश गेला असून, नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविणे हा केवळ कायद्याचा भंग नसून, तो इतरांच्या आयुष्याशी खेळ करणारा गंभीर गुन्हा असल्याचे पोलिसांकडून वारंवार अधोरेखित करण्यात येत आहे.
यापुढेही अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे सांगत, वाहनचालकांनी मद्यप्राशन न करता वाहने चालवावीत, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि अनावश्यक न्यायालयीन कारवाई व दंड टाळावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त विवेक पाटील (वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड) यांच्या वतीने करण्यात आले आहे.