Home Breaking News ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन; शौर्यदिनानिमित्त मानवंदना

ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन; शौर्यदिनानिमित्त मानवंदना

52
0
पुणे :- भीमा-कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाच्या २०८ व्या शौर्यदिनानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी पेरणेफाटा येथील विजयस्तंभास विधिवत अभिवादन केले. या प्रसंगी त्यांनी देशाच्या इतिहासातील शौर्य, समता आणि स्वाभिमानाच्या परंपरेला मानवंदना दिली.
या अभिवादन सोहळ्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) चे महासंचालक सुनील वारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,
“दरवर्षीप्रमाणे राज्य शासनाच्या वतीने विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहोत. हे अभिवादन केवळ शासनाचे नाही, तर संपूर्ण राज्यातील नागरिकांच्यावतीने आहे. विजयस्तंभ हा शौर्य, बलिदान आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचे प्रतीक आहे.”
ते पुढे म्हणाले की, विजयस्तंभ अभिवादन 54सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. शासन या सोहळ्याला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
जिल्हा प्रशासनाने केलेल्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी समाधान व्यक्त केले. दरवर्षी लाखो अनुयायी विजयस्तंभास अभिवादनासाठी येत असल्याने सुरक्षा, वाहतूक, आरोग्य सुविधा आणि स्वच्छता याबाबत शासन आणि प्रशासनाकडून योग्य ती दक्षता घेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
शौर्यदिनाच्या निमित्ताने भीमा-कोरेगाव परिसरात भक्तीभाव, शिस्त आणि ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडले. हा दिवस केवळ इतिहासाची आठवण करून देणारा नसून, लोकशाही, समता आणि संविधानिक मूल्यांची प्रेरणा देणारा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.