Home Breaking News पुणे रेल्वेचा ५ वर्षांचा मास्टर प्लॅन जाहीर; ६ नवे प्लॅटफॉर्म, ६० अतिरिक्त...

पुणे रेल्वेचा ५ वर्षांचा मास्टर प्लॅन जाहीर; ६ नवे प्लॅटफॉर्म, ६० अतिरिक्त गाड्या आणि २ सॅटेलाइट स्टेशन उभारणार

63
0
पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या क्षमतेत मोठी वाढ करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने महत्त्वाकांक्षी ५ वर्षांचा मास्टर प्लॅन आखला असून, त्याअंतर्गत शहराच्या रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये ऐतिहासिक बदल घडणार आहेत. या योजनेमुळे पुणे स्थानकाची प्रवासी हाताळण्याची क्षमता दुप्पट होणार असून, दररोज हजारो प्रवाशांना थेट दिलासा मिळणार आहे.
या मास्टर प्लॅननुसार पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याबरोबरच ६ नवे प्लॅटफॉर्म उभारले जाणार आहेत. सध्या पुणे स्थानकावरून सुमारे ५० गाड्या सुरू होतात, मात्र पुढील पाच वर्षांत हा आकडा वाढवून ११० गाड्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. म्हणजेच तब्बल ६० नव्या गाड्या पुण्यातून सुरू होणार आहेत.
याशिवाय, पुण्याहून धावणाऱ्या ७५ गाड्यांमध्ये १९८ अतिरिक्त डबे जोडले जाणार असून, याचा थेट फायदा सुमारे २० हजार प्रवाशांना होणार आहे. नव्या ६० गाड्यांमुळे सुमारे १.५ लाख प्रवाशांना दररोज प्रवासाची सुविधा मिळणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील ४८ प्रमुख रेल्वे स्थानकांची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला असून, त्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर स्थानकांचा समावेश आहे. पुणे स्थानकाच्या विकासादरम्यान जागेच्या मर्यादा लक्षात घेऊन २ सॅटेलाइट स्टेशन विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सॅटेलाइट स्थानकांचीही क्षमता वाढवली जाणार आहे.
भविष्यात गाड्यांची संख्या वाढली तरी पुणे स्थानकावर ताण येऊ नये यासाठी आळंदी (सातारा रेल्वे मार्गावर), उरुळी आणि फुरसुंगी येथे मेगा कोचिंग टर्मिनल्स उभारण्यात येणार आहेत. यामुळे गाड्यांचे व्यवस्थापन अधिक सुलभ होईल आणि शहरातील वाहतूक व प्रवासी सुविधांवर सकारात्मक परिणाम होईल.
रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहेरा यांनी सांगितले की,
“हा रेल्वेचा दीर्घकालीन मास्टर प्लॅन आहे. पुढील पाच वर्षांत केवळ पुणेच नव्हे, तर आसपासच्या रेल्वे स्थानकांमध्येही मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा वाढतील. गाड्या आणि डब्यांची संख्या वाढल्यामुळे वेटिंग लिस्ट कमी होण्यास मदत होईल आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर बनेल.” या योजनेमुळे पुणे आणि परिसरातील रेल्वे प्रवासाला नवी दिशा मिळणार असून, वाढत्या लोकसंख्येच्या आणि प्रवासी मागणीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.