Home Breaking News नामनिर्देशनाच्या अवघ्या अडीच तास आधी भाजप–शिवसेना युती तुटली; पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीत मोठी फूट,...

नामनिर्देशनाच्या अवघ्या अडीच तास आधी भाजप–शिवसेना युती तुटली; पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीत मोठी फूट, PCMC निवडणुकीत रंगणार थेट लढत

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महायुतीला मोठा धक्का बसला आहे. नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी अवघ्या अडीच तास आधी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यातील युती चर्चेला पूर्णविराम मिळाला. या अचानक घडलेल्या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, शिंदे गटाच्या उमेदवारांमध्ये शेवटच्या क्षणी अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू झाली.
राज्य आणि केंद्रात एकत्र सत्तेत असलेली भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) महायुती पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र अंतर्गत मतभेदांमुळे डगमगत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला भाजप आणि राष्ट्रवादीमधील ‘मैत्रीपूर्ण लढत’ आता मैत्रीपूर्ण न राहता आक्रमक राजकारणात बदलल्याचे चित्र दिसत आहे.
मंगळवारी नामनिर्देशनाच्या अंतिम टप्प्यात शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शहरातील युती तुटल्याची अधिकृत घोषणा केली. भाजप, शिंदे शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यात एकत्र निवडणूक लढवण्याबाबत अनेक बैठका झाल्या होत्या. शिवसेनेने सुरुवातीला २९ जागांची मागणी केली होती. पहिल्या बैठकीत हा आकडा १६ वर, नंतर १३ वर आणि अखेर अंतिम बैठकीत १० जागांवर आला. मात्र, या मागण्यांवर कोणताही तोडगा न निघाल्याने चर्चा निष्फळ ठरल्या.
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक २३ आणि २४ या जागांवरून तिढा अधिक तीव्र झाला, ज्यामुळे अखेर युती तुटण्याचा निर्णय झाला. भाजपने आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ला पाच जागा दिल्या असून हे उमेदवार कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “शिवसेना आणि भाजप यांची पारंपरिक युती आहे. त्यामुळे PCMC निवडणुकीसाठी युती व्हावी यासाठी मी स्वतः पुढाकार घेतला. शहराध्यक्ष आणि आमदारांशी सातत्याने चर्चा झाली. २९ जागांपासून चर्चा १० जागांपर्यंत आली, पण अखेरीस सकारात्मक निर्णय झाला नाही.”
ते पुढे म्हणाले, “चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्याशी दुपारपर्यंत संपर्कात होतो. मात्र पक्षातील कार्यकर्ते जागा सोडायला तयार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शेवटच्या क्षणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घ्यावा लागला. युती तुटल्याचे वाईट वाटते, पण २०१७ प्रमाणेच यंदाही कोणतीही कटुता न ठेवता आम्ही आमच्या ताकदीवर निवडणूक लढवणार आहोत.”
या घडामोडींमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. आता भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र ताकदीने मैदानात उतरल्याने PCMC निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत निर्णायक ठरणार आहे.