पुणे : वर्ष २०२५ निरोप घेत असताना पुणेकरांना २०१८ नंतरची सर्वात थंड सकाळ अनुभवायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) शिवाजीनगर वेधशाळेने मंगळवार, ३० डिसेंबर रोजी किमान तापमान ९.९ अंश सेल्सिअस नोंदवले आहे. मागील वर्षी याच दिवशी हेच तापमान तब्बल १७.६ अंश सेल्सिअस होते, त्यामुळे यंदाची थंडी अधिक तीव्र असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, २०१८ साली ३० डिसेंबर रोजी पुण्यात किमान तापमान ६ अंश सेल्सिअस आणि ३१ डिसेंबर रोजी ६.९ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले होते. त्यानंतर इतकी थंडी वर्षअखेरीस पुन्हा एकदा जाणवू लागली आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळी शहरभर गारठा वाढलेला दिसून येत आहे.
मंगळवारी पुण्यातील विविध भागांमध्ये तापमानात लक्षणीय फरक दिसून आला. 📍 पाषाण येथे किमान तापमान ९.३ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. 📍 कोरेगाव पार्क – १३.९ अंश 📍 लोणीकंद/लोहेगाव – १३.४ अंश 📍 चिंचवड – १४.७ अंश 📍 मगरपट्टा – १५.८ अंश
हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे आणि स्वच्छ आकाशामुळे तापमानात मोठी घसरण झाली आहे. आगामी नववर्षाच्या पहिल्या काही दिवसांतही किमान तापमान १० अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता असून सकाळी व रात्री अधिक थंडी जाणवणार आहे.
या कडाक्याच्या थंडीचा परिणाम ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींवर अधिक होऊ शकतो, त्यामुळे आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सकाळच्या वेळेत बाहेर पडताना उबदार कपडे वापरणे, गरम पेयांचे सेवन करणे आणि थंडीपासून संरक्षण घेणे आवश्यक असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
एकीकडे नववर्षाच्या स्वागतासाठी शहर सज्ज होत असताना, दुसरीकडे पुणेकरांना हुडहुडी भरवणारी थंडी नववर्षाच्या सुरुवातीला अनुभवायला मिळणार असल्याचे चित्र आहे.