Home Breaking News अपघाताबाबत नवे वास्तव समोर : ट्रक ओव्हरलोड असला तरी दुर्घटनेचे मूळ कारण...

अपघाताबाबत नवे वास्तव समोर : ट्रक ओव्हरलोड असला तरी दुर्घटनेचे मूळ कारण बोलेरो चालकाची निष्काळजीपणा

अपघाताच्या प्रकरणात आता महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. संबंधित ट्रक ओव्हरलोड आणि अवैध असल्याचे स्पष्ट असले, तरी या अपघाताचा थेट संबंध ओव्हरलोडिंगशी नसल्याचे प्रत्यक्षदर्शी व प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. उलटपक्षी, SDO यांच्या बोलेरो वाहनचालकाची गंभीर निष्काळजीपणा अपघातास कारणीभूत ठरल्याचा दावा केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो चालकाने वाहन वळवताना इंडिकेटरचा वापर केला नाही, तसेच अत्यंत हळू गतीने अचानक वळण घेतले. याशिवाय, साइड मिरर तपासण्याचेही आवश्यक भान त्याने ठेवले नाही. वाहतूक नियमांचे पालन केले असते, तर हा अपघात सहज टाळता आला असता, असे तज्ज्ञांचे मत आहे.
अपघातस्थळी उपलब्ध परिस्थिती, वाहनांची स्थिती आणि संभाव्य ब्रेकिंग डिस्टन्स लक्षात घेता, बोलेरो चालकाने वेळेत निर्णय घेतला असता किंवा किमान सिग्नल दिला असता, तर मागून येणाऱ्या वाहनाला प्रतिक्रिया देण्याची पुरेशी संधी मिळाली असती. त्यामुळे संपूर्ण दोष ट्रकचालकावर ढकलणे योग्य ठरणार नाही, अशीही चर्चा सुरू आहे.
दरम्यान, ट्रक अवैध व ओव्हरलोड असल्यामुळे स्वतंत्र कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र अपघाताच्या कारणांचा निष्पक्ष तपास होऊन दोषी कोण आहे हे स्पष्टपणे समोर आणावे, अशी मागणी नागरिक व वाहनचालक संघटनांकडून केली जात आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या वाहनचालकांवरही तितकीच जबाबदारी आणि नियमपालनाची सक्ती असावी, हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.