पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने प्रचार यंत्रणेला नवे बळ देत ६ अत्याधुनिक LED व्हॅन नागरिकांच्या सेवेत उतरविल्या आहेत. पुणे शहर कार्यालयात या LED व्हॅनचे भव्य लोकार्पण केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधरअण्णा मोहोळ तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या वेळी भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या लोकार्पण प्रसंगी बोलताना नेत्यांनी सांगितले की, केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या लोकहितकारी, विकासाभिमुख व जनकल्याणकारी योजनांची माहिती थेट पुणेकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या LED व्हॅन अत्यंत प्रभावी ठरणार आहेत. सरकारच्या कामकाजाचा आढावा, शहर व राज्यातील विविध विकास प्रकल्प, तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू असलेल्या योजनांची सविस्तर माहिती या व्हॅनद्वारे दाखविण्यात येणार आहे.
पुणे शहरातील सर्व आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये या ६ LED व्हॅन कार्यरत राहणार असून, भाजप उमेदवारांच्या प्रचारात त्या महत्त्वाची भूमिका बजावतील. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रचार अधिक प्रभावी, पारदर्शक आणि जनतेपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, शहराध्यक्ष धिरज घाटे, शहर सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, प्रमोद कोंढरे, प्रशांत हरसूले यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी निवडणुकीत भाजपच्या प्रचार मोहिमेला या LED व्हॅनमुळे नवी दिशा व गती मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.