Home Breaking News आंबेगाव खून प्रकरणाचा छडा; नांदेडमधून आरोपी जेरबंद, पुणे पोलिसांची जलद आणि ठोस...

आंबेगाव खून प्रकरणाचा छडा; नांदेडमधून आरोपी जेरबंद, पुणे पोलिसांची जलद आणि ठोस कारवाई

पुणे शहरात घडलेल्या तरुणाच्या निर्घृण खून प्रकरणाचा अखेर पर्दाफाश झाला असून, आंबेगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत आरोपींना नांदेड येथून अटक करत मोठे यश मिळवले आहे. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या रागातून हा खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी आंबेगाव बुद्रुक येथील गायमुख चौक परिसरातील गुरुदत्त वॉशिंग सेंटर येथे ही गंभीर घटना घडली. मयत जावेद खादमियाँ पठाण (वय ३४) हे त्यांच्या नातेवाईकांसोबत काम करत असताना आरोपी तेथे आले. जावेद आणि आरोपीच्या बहिणीमधील प्रेमसंबंधाचा राग मनात धरून आरोपींनी जावेद याच्याशी हुज्जत घातली.
वाद वाढल्यानंतर संदिप रंगराव भुरके (वय २५) व त्याचा मित्र ओमप्रसाद ऊर्फ दत्ता गणेश किरकन (वय २०) यांनी लोखंडी हत्याराने जावेद यांच्या डोक्यावर व हातावर जबर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत जावेद यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६५/२०२५ अंतर्गत भा.न्या.सं. कलम १०३(१), ३(५), आर्म अॅक्ट ४ (२५), मपोअधि कलम ३७ (१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपी मूळचे नांदेड जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळताच, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तात्काळ नांदेडकडे रवाना करण्यात आले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने भोकर व नांदेड शहर परिसरातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गजानन चोरमले करीत आहेत.
ही संपूर्ण कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-२ श्री. मिलिंद मोहिते आणि मा. सहा. पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. आंबेगाव पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे खून प्रकरणातील आरोपी लवकरच गजाआड गेले आहेत. या कारवाईमुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होणाऱ्यांना पुणे पोलीस कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाहीत, असा ठाम संदेश पुन्हा एकदा दिला गेला आहे.