Home Breaking News वाघोलीत अवैध दारूविक्रीवर पुणे पोलिसांचा जोरदार घाव; २१ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल...

वाघोलीत अवैध दारूविक्रीवर पुणे पोलिसांचा जोरदार घाव; २१ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त, एकास अटक

80
0
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अवैध दारूविक्रीविरोधात मोठी कारवाई करत दारू माफियांना चांगलाच धक्का दिला आहे. २४ डिसेंबर २०२५ रोजी वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल २१,८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
मा. वरिष्ठांच्या सूचनेनुसार तपास पथक आव्हळवाडी व मांजरी परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार अशोक शेळके यांना गोपनीय बातमी मिळाली. व्हीटीपी रोड, आव्हळवाडी येथे पत्र्याच्या शेडजवळ अवैध दारूविक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सापळा रचला.
पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार राम ठोंबरे, अशोक शेळके व गहिनाथ बोयणे यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता आप्पा कल्याण साळवे (वय ४७), रा. पत्रावस्ती, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे हा इसम अवैधरित्या गावठी हातभट्टी तयार दारू तसेच देशी-विदेशी दारूची विक्री करताना आढळून आला.
छाप्यात आरोपीच्या ताब्यातून
🔹 १६,८४० रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या २४४ बाटल्या
🔹 ४,९०० रुपये किमतीच्या गावठी हातभट्टी दारूचे २४५ पाऊच
असा एकूण २१,८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परीमंडळ-७ श्री. सोमय मुंडे आणि मा. सहा. पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग श्री. नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.
या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीला मोठा आळा बसला असून, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलीस कठोर पावले उचलत असल्याचा स्पष्ट संदेश गुन्हेगारांना मिळाला आहे.