Home Breaking News पुण्यात मद्यपी चालकांविरोधात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; ४ दिवसांत २४२ जणांवर कारवाई

पुण्यात मद्यपी चालकांविरोधात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई; ४ दिवसांत २४२ जणांवर कारवाई

83
0
पुणे | दि. 29 डिसेंबर 2025
पुणे शहरातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांविरोधात कडक पावले उचलण्यात आली आहेत. ख्रिसमस व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी वाहतूक पोलिसांनी २५ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत सलग चार दिवस विशेष मोहीम राबवली.
या मोहिमेदरम्यान पुणे शहरातील विविध प्रमुख चौक, रस्ते व संवेदनशील भागांमध्ये नाकाबंदी पॉईंट उभारून वाहनचालकांची सखोल तपासणी करण्यात आली. आधुनिक ब्रेथ अ‍ॅनालायझरच्या मदतीने मद्यप्राशन केलेल्या चालकांची तपासणी करण्यात आली. या विशेष कारवाईत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या तब्बल २४२ वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाईसह पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवण्यात आली असून, काही प्रकरणांमध्ये परवाने जप्त करण्याची कारवाईदेखील करण्यात आली आहे. वाहतूक विभागाच्या या कठोर भूमिकेमुळे नियम तोडणाऱ्या चालकांमध्ये चांगलाच धाक निर्माण झाला आहे.
पुणे शहर वाहतूक विभागाने नागरिकांना पुन्हा एकदा स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, मद्यप्राशन करून वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा असून यामुळे केवळ स्वतःचेच नव्हे तर इतर निरपराध नागरिकांचेही जीव धोक्यात येतात. अपघात टाळण्यासाठी व सुरक्षित शहर घडवण्यासाठी सर्व नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवरही अशीच कडक कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत वाहतूक विभागाकडून देण्यात आले आहेत.