Home Breaking News मुंबई महापालिका निवडणूक : मुलुंड पश्चिम प्रभाग १०७ मधून डॉ. नील सोमय्या...

मुंबई महापालिका निवडणूक : मुलुंड पश्चिम प्रभाग १०७ मधून डॉ. नील सोमय्या यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, आज भाजपचे युवा नेते डॉ. नील सोमय्या यांनी मुलुंड पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १०७ मधून आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केला. या अर्ज दाखल कार्यक्रमावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या, आमदार मिहीर कोटेचा तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अर्ज दाखल केल्यानंतर डॉ. नील सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधताना मुलुंड पश्चिम परिसराच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त केला. पायाभूत सुविधा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सेवा, पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे त्वरित निराकरण हे आपल्या प्रचाराचे मुख्य मुद्दे असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. मुलुंडकर नागरिकांचा विश्वास आणि पाठिंबा मिळाल्यास प्रभागाचा विकास आदर्श पद्धतीने करून दाखवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले की, डॉ. नील सोमय्या हे तरुण, शिक्षित आणि विकासाभिमुख नेतृत्व असून, त्यांच्या माध्यमातून प्रभाग १०७ मध्ये पारदर्शक व लोकाभिमुख कारभार होईल. आमदार मिहीर कोटेचा यांनीही भाजप कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून डॉ. नील सोमय्या यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
प्रभाग १०७ मध्ये भाजपची ताकद दाखवून देणारी ही उमेदवारी मानली जात असून, आगामी काळात निवडणुकीचा प्रचार अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.