Home Breaking News वानवडी पोलिसांचा धडाका! टेम्पोचा पाठलाग करून १,१५० लिटर गावठी हातभट्टी दारूसह ४...

वानवडी पोलिसांचा धडाका! टेम्पोचा पाठलाग करून १,१५० लिटर गावठी हातभट्टी दारूसह ४ आरोपी अटकेत

पुणे | प्रतिनिधी
पुणे शहरात अवैध दारूविक्री व वाहतुकीविरोधात वानवडी पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी आणि धाडसी कारवाई करत टेम्पोचा थरारक पाठलाग करून तब्बल १,१५० लिटर गावठी हातभट्टी दारूसह चार आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर दारूव्यवसायाला मोठा धक्का बसला असून, पोलिसांच्या सतर्कतेचे आणि तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. ही कारवाई दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली. पेट्रोलिंगदरम्यान पोलीस अंमलदार दया शेगर व अमोल पिलाणे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हातभट्टीची गावठी दारू टेम्पोमधून वाहतूक केली जाणार आहे. या महत्त्वाच्या माहितीची तात्काळ दखल घेत पोलिसांनी संशयित वाहनाचा शोध सुरू केला. दरम्यान सदर टेम्पो घोरपडी, पुणे परिसराच्या दिशेने जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर, पोलीस तपास पथकाने सापळा रचत पाठलाग केला आणि संशयित टेम्पो ताब्यात घेतला. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये चार इसम आढळून आले.

त्यांची नावे व पत्ते पुढीलप्रमाणे असल्याचे निष्पन्न झाले –
  1. लियाकत रोहीत अब्बासी (वय ३२, रा. सोपानबाग, पुणे)
  2. श्रीकांत बापू साबळे (वय २१, रा. सोरतापवाडी फाटा, ऊरळी कांचन)
  3. संकेत विजय वाबळे (वय १९)
  4. विशाल दुर्योधन संगोडिया (वय १८, रा. गाडामुडी गाव, यवत, पुणे)
अधिक चौकशीत आरोपी क्रमांक १ ने पुणे शहरात गावठी हातभट्टी दारू सहज उपलब्ध होत नसल्याने ती यवत येथून खरेदी करून टेम्पोमधून शहरात आणली जात असल्याची कबुली दिली. तपासादरम्यान टेम्पोमध्ये ३५ लिटर क्षमतेचे एकूण ३३ कॅन, म्हणजेच १,१५० लिटर गावठी हातभट्टी दारू आढळून आली. या कारवाईत पोलिसांनी दारूसह ती वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला टेम्पो असा एकूण सुमारे ५ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ५२०/२०२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख करत आहेत.
ही प्रभावी कारवाई मा. पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-०५) सौ. राजलक्ष्मी शिवणकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (वानवडी विभाग) सौ. नम्रता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भाऊसाहेब पाटील व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सौ. संगीता जाधव यांच्या सूचनेनुसार तपास पथकाने ही कामगिरी बजावली. या यशस्वी मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, तसेच अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, आशिष कांबळे, अमोल गायकवाड, गोपाळ मदने, विष्णु सुतार, अभिजित चव्हाण, बालाजी वाघमारे, विठ्ठल चोरमले व अर्षद सय्यद यांनी मोलाची भूमिका बजावली. या कारवाईमुळे शहरात अवैध दारूविक्रीमुळे होणाऱ्या सामाजिक आणि कायदा-सुव्यवस्थेच्या समस्यांवर नियंत्रण मिळण्यास मदत होणार आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पुणे पोलिसांचा हा धडाका आगामी काळात अवैध धंद्यांवर आणखी कडक कारवाईचे संकेत देणारा ठरत आहे.