Home Breaking News पर्वती पोलिसांची मोठी कामगिरी; पिकअप वाहन चोरीप्रकरणी आरोपी अटकेत, १४ लाखांचा मुद्देमाल...

पर्वती पोलिसांची मोठी कामगिरी; पिकअप वाहन चोरीप्रकरणी आरोपी अटकेत, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

80
0
पुणे | प्रतिनिधी
पुणे शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांवर प्रभावी आळा घालत पर्वती पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोठी आणि उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चारचाकी पिकअप वाहन चोरीप्रकरणी आरोपीस अटक करून तब्बल १४ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे वाहनचोरी करणाऱ्या टोळ्यांना कडक इशारा मिळाला आहे.
दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी पर्वती पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३९७/२०२५ अन्वये भा.न्या.सं.क. ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांच्या ताब्यातील एम. महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी (किंमत अंदाजे ९ लाख रुपये) तसेच त्यामध्ये असलेल्या ५ लाख २९ हजार रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह एकूण १४ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची नोंद होती. या घटनेमुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली होती.
या गुन्ह्याचा सखोल तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) सौ. अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला. तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री. किरण पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू ठेवला. तपासादरम्यान पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक व स्वप्निल घुगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सापळा रचण्यात आला. त्यानुसार आरोपी शिवा मिडलाल यादव (वय २० वर्षे, रा. काळुबाई मंदिराजवळ, वरद अपार्टमेंट, जाधव वस्ती, चिखली, पुणे) यास अत्यंत शिताफीने पकडण्यात आले. आरोपीस तात्काळ दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली.
अटक केल्यानंतर आरोपीकडून एम. महिंद्रा पिकअप वाहन तसेच चोरीस गेलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे बॉक्स असा एकूण १४,०९,००० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पुढील तपासात आरोपीकडून आणखी गुन्ह्यांची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ही यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-०२ श्री. मिलिंद मोहिते व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सौ. अनिता हिवरकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. राहुल नामदे यांच्या सूचनेनुसार तपास पथकाने ही कामगिरी फत्ते केली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक किरण पवार, अंमलदार सदाशिव कोपनर, प्रकाश मरगजे, प्रविण जगताप, महेश मंडलिक, स्वप्निल घुगे, सूर्या जाधव, सद्दाम शेख, मनोज बनसोड, अमोल दबडे, अमित चिव्हे, नाना सोखाडे, राकेश सुर्वे व किर्ती भोसले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पुणे पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे वाहनचोरी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होणार असल्याचे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.