Home Breaking News मांजरी पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गांजा विक्री करणारा आरोपी अटकेत, ३३ हजारांचा...

मांजरी पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गांजा विक्री करणारा आरोपी अटकेत, ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुणे | प्रतिनिधी
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाने अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. याच कारवाईचा भाग म्हणून मांजरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गांजा विक्री करणाऱ्या आरोपीस अटक करून मोठी कामगिरी बजावण्यात आली आहे.
पुणे शहर पोलीस दलाकडून सातत्याने नाकाबंदी, पेट्रोलिंग, गुन्हेगार तपासणी तसेच अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बाबासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरी पोलीस स्टेशनचे तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना संशयास्पद हालचाली करत असलेला एक इसम आढळून आला. सदर इसमास तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे नाव सागर मल्हारी राखपसरे (वय ३४ वर्षे, रा. मांजरी) असे निष्पन्न झाले.
आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याच्याकडून १ किलो ०५१ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून, या अमली पदार्थाची अंदाजे किंमत ₹३३,९३०/- इतकी आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक उमेश रोकडे हे करीत आहेत.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ६, श्री. सागर कवडे, तसेच मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणीकाळभोर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सदर कामगिरीत मांजरी पोलीस स्टेशनचे तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे यांच्यासह पोलीस अंमलदार प्रदीप सोनवणे, सचिन जाधव, निखील पवार, प्रशांत दुधाळ, अशोक अंधारे, चंद्रकांत रेजितवाड, रविकांत कचरे, ज्ञानेश्वर चोरमले आणि माधव हिरवे यांनी मोलाची भूमिका बजावली.
पुणे शहरात अमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर अंकुश ठेवण्यासाठी अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.