Home Breaking News २० महिन्यांनंतर खुनाचा गुन्हा उघड; हडपसर पोलिसांनी फरार आरोपीला हरिद्वारमधून केले अटक

२० महिन्यांनंतर खुनाचा गुन्हा उघड; हडपसर पोलिसांनी फरार आरोपीला हरिद्वारमधून केले अटक

77
0
पुणे | प्रतिनिधी
पुणे शहरातील गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी बजावली आहे. हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यात तब्बल २० महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीस उत्तराखंडातील हरिद्वार येथून अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत पोलीस दलाची दक्षता पुन्हा अधोरेखित झाली आहे.
 
उन्नतीनगर परिसरातील कॅनॉलमध्ये एक इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. स्थानिक नागरिकांनी तत्काळ माहिती दिल्यानंतर सदर इसमास ससून सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. पुढील चौकशीत मृत इसमाचे नाव विनोद मधुकर शार्दुल (वय ४५, रा. दिवा ईस्ट) असे निष्पन्न झाले.
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. ४ मे २०२४ रोजी लक्ष्मी कॅनॉल, स्वारगेट येथे मृत इसम व त्याच्या ओळखीच्या इसमांमध्ये वाद झाला होता. या वादातून आरोपींनी संगनमत करून विनोद शार्दुल यांना कॅनॉलमध्ये ढकलून जिवे ठार मारल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५०७/२०२५ अन्वये भा.दं.वि. कलम ३०२, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते.
सदर गुन्ह्याच्या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. पोलीस अंमलदार संदीप राठोड यांनी केलेल्या सखोल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला. आरोपी राहत असलेला लॉज निश्चित झाल्यानंतर तपास पथकाने थेट उत्तराखंड राज्यातील हरिद्वार येथे जाऊन दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी हॉटेलबाहेर येताच आरोपीस ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव वैभव मनोज जाधव (वय २४, रा. औरंगाबाद) असे आहे. आरोपीस अटक केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून, खुनाच्या गुन्ह्यातील इतर बाबींचा तपास वेगाने करण्यात येत आहे.
ही यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ६, डॉ. सागर कवडे, तसेच मा. सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग, श्री. अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय मोगले व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे यांच्या सूचनेनुसार तपास पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड यांच्यासह अंमलदार दीपक कांबळे, भाऊसाहेब खटके, निलेश किरवे, बापू लोणकर, विजय कानेकर, अजित मदने, भगवान हंबर्डे, आकाश धावडे, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, महावीर लोंढे व अमोल जाधव यांनी मोलाचे योगदान दिले. पुणे पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगार कितीही दिवस फरार राहिले तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाहीत, असा ठाम संदेश समाजात गेला आहे.