महाराष्ट्राच्या प्रशासकीय व कायदा-सुव्यवस्थेच्या क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेल्या निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) रेहाना गफूर शेख यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अधिकृत प्रवेश केला. मुंबईतील मातोश्री येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्यामुळे शिवसेनेच्या राजकीय व संघटनात्मक ताकदीत भर पडल्याचे मानले जात आहे.
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांनी स्वतः रेहाना शेख यांचे पक्षात स्वागत करत, त्यांच्या अनुभवाचा आणि प्रामाणिक सेवाभावाचा पक्षाला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. प्रशासनात काम करताना त्यांनी कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षेचे प्रश्न, सामाजिक सलोखा आणि संवेदनशील प्रकरणांमध्ये घेतलेली भूमिका उल्लेखनीय राहिली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पोलीस दलातील दीर्घ सेवेनंतर सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात अधिक सक्रिय भूमिका बजावण्याच्या उद्देशाने रेहाना शेख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले. सामान्य नागरिक, महिला, अल्पसंख्याक आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे काम करण्याची संधी शिवसेनेत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते व सचिव खासदार अनिल देसाई, विभागप्रमुख संतोष शिंदे, विभाग संघटक युगंधरा साळेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी रेहाना शेख यांचे पक्षात स्वागत करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राजकारणात अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा प्रवेश वाढत असताना, रेहाना शेख यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची महिला नेतृत्व, कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक प्रश्नांवरील भूमिका अधिक भक्कम होईल, असा राजकीय वर्तुळात अंदाज व्यक्त केला जात आहे.