Home Breaking News “नवीन कर्मभूमीला वंदन” – काँग्रेस भवनातून देशसेवेचा नवा संकल्प

“नवीन कर्मभूमीला वंदन” – काँग्रेस भवनातून देशसेवेचा नवा संकल्प

पुणे | प्रतिनिधी
“नवीन कर्मभूमीला वंदन” अशा भावनिक शब्दांत काँग्रेस पक्षात प्रवेशानंतरचा पहिला अनुभव व्यक्त करत आज पुण्यातील ऐतिहासिक काँग्रेस भवनात पहिल्यांदा अधिकृत पाऊल टाकण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा कणा असलेल्या आणि देशाला दिशा देणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या या वास्तूत प्रवेश करताना केवळ अभिमान नव्हे, तर मोठ्या जबाबदारीची जाणीव झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
यापूर्वी अनेकदा काँग्रेस भवनला भेट दिली असली, तरी आजचा दिवस विशेष ठरला. कारण आज या वास्तूतील ऊर्जेसोबतच देशसेवेच्या मूल्यांची आणि विचारांची बांधिलकी अधिक तीव्रपणे जाणवली. महात्मा गांधीजींनी काँग्रेस भवनाला पहिल्यांदा भेट दिली असताना, “यह मकान सच्चे सेवकोंका यानी खिदमदगारोंका मकान बने” असे जे उद्गार काढले होते, त्यांचा अर्थ आज अधिक खोलवर उमगल्याचे सांगण्यात आले.
हेच काँग्रेस भवन स्वातंत्र्य चळवळीतील अनेक ऐतिहासिक निर्णयांचे आणि संघर्षांचे साक्षीदार राहिले आहे. भविष्यातही समाजहिताचे, पुरोगामी विचारांचे आणि लोकशाही मूल्यांचे केंद्र म्हणून हे काँग्रेस भवन अग्रभागी राहील, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला. देशाचा “सच्चा सेवक” होण्याच्या मार्गावर हीच नवी कर्मभूमी प्रेरणास्थान ठरेल, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
या प्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री. अरविंदजी शिंदे, माजी राज्यमंत्री श्री. रमेशदादा बागवे, ज्येष्ठ नेते श्री. अभयजी छाजेड, माजी आमदार दीप्तीताई चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. पक्ष संघटन मजबूत करणे, जनतेचे प्रश्न रस्त्यावरून विधिमंडळापर्यंत पोहोचवणे आणि काँग्रेसची विचारधारा तळागाळात नेणे, या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
“यापुढे पक्षाच्या प्रत्येक संघर्षात, प्रत्येक आंदोलनात आणि प्रत्येक जनसेवेच्या कार्यात खांद्याला खांदा लावून काम करेन,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. काँग्रेसच्या विचारधारेसोबत प्रामाणिकपणे उभे राहत, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढण्याचा निर्धारही स्पष्ट करण्यात आला.