लातूर | प्रतिनिधी — पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुरू असलेल्या परिवर्तनकारी विकासकार्याने आणि मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या चौफेर विकासाच्या धोरणांनी प्रभावित होऊन लातूर जिल्ह्यात भाजपला मोठे बळ मिळाले आहे. काल झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात नगरसेवक श्री. रविशंकर जाधव व श्री. पुनित पाटील, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. चंद्रकांत सोळुंके, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. अशोक देढे, गनिमी कावा संघटनेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत जोगदंड, श्री धर्मेंद्र चौहान, श्री सुरेंद्र चौहान व श्री ऋषी पाटील यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक सक्रिय कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.
या सर्व मान्यवरांनी भाजपचा झेंडा आपल्या खांद्यावर घेत विकास, सुशासन आणि लोकहिताच्या राजकारणाशी आपली बांधिलकी व्यक्त केली. विविध क्षेत्रातील अनुभवी व कार्यक्षम कार्यकर्त्यांचा हा प्रवेश भाजपची संघटनात्मक ताकद वाढवणारा असून, जिल्ह्यातील राजकीय वाऱ्याची दिशा स्पष्ट करणारा मानला जात आहे.
या कार्यक्रमास निवडणूक प्रमुख आ. श्री संभाजीराव पाटील निलंगेकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री बसवराज पाटील, आ. श्री रमेशप्पा कराड, डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, शहर जिल्हाध्यक्ष श्री अजित पाटील कव्हेकर, तसेच श्री शैलेश लाहोटी, श्री शैलेश गोजमगुंडे, श्री देविदास काळे, श्रीमती प्रेरणाताई होनराव, श्री सुधीर धुत्तेकर, श्री संजय गिरजी, सौ. रागिणीताई यादव, श्री प्रविण कस्तुरे, श्री निखिल गायकवाड, निवडणूक कार्यालय प्रमुख श्री तुकाराम गोरे व असंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना नेत्यांनी सांगितले की, भाजप हा केवळ राजकीय पक्ष नसून विकासाची चळवळ आहे. केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना, पायाभूत सुविधा, शेतकरी, महिला, युवक व समाजातील सर्व घटकांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांमुळे भाजपवर जनतेचा विश्वास अधिक दृढ होत आहे. त्यामुळेच विविध विचारधारांतील कार्यकर्ते भाजपमध्ये सहभागी होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. एकूणच, लातूर जिल्ह्यात झालेला हा पक्षप्रवेश आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी निर्णायक ठरणारा असून, विकासाच्या राजकारणाला मिळालेला वाढता पाठिंबा यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाला आहे.