Home Breaking News बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ साठी अधिकाऱ्यांचे मास्टर प्रशिक्षण यशस्वी

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ साठी अधिकाऱ्यांचे मास्टर प्रशिक्षण यशस्वी

92
0
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेला मास्टर प्रशिक्षण कार्यक्रम (प्रशिक्षकांचे प्रशिक्षण – ToT) यशस्वीरित्या पार पडला. भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्ष सभागृह येथे हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या प्रशिक्षण कार्यक्रमाला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) श्री. विजय बालमवार तसेच विशेष कार्य अधिकारी (अतिक्रमण निर्मूलन, म्हाडा) श्री. संदीप कळंबे यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरळीत आणि त्रुटीविरहित पार पाडण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
या प्रशिक्षणामध्ये ईव्हीएम यंत्र हाताळणी व सुरक्षितता, मतदान साहित्याचे योग्य व्यवस्थापन, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांची भूमिका, मतदानाच्या प्रत्येक टप्प्यावर करावयाची जबाबदारी, मॉक पोलची प्रक्रिया, मतदानपूर्व नियोजन, मतदार ओळखपत्र तपासणी, तसेच ईव्हीएम यंत्र सील करण्याच्या नियमावली यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष उदाहरणे व तांत्रिक माहितीच्या आधारे प्रशिक्षण देण्यात आल्याने सहभागी अधिकाऱ्यांना निवडणूक कामकाजाबाबत अधिक आत्मविश्वास मिळाला आहे.
महानगरपालिका निवडणूक ही लोकशाही प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची कडी असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुसज्ज प्रशिक्षण ही यशस्वी निवडणुकीची गुरुकिल्ली आहे. या मास्टर प्रशिक्षणाच्या माध्यमातून पुढील स्तरावर इतर कर्मचाऱ्यांनाही प्रभावी प्रशिक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.