Home Breaking News विचारांशी तडजोड नाही! अनेक पक्षांच्या ऑफर धुडकावून प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश;...

विचारांशी तडजोड नाही! अनेक पक्षांच्या ऑफर धुडकावून प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; टिळक भवनमध्ये भव्य सत्कार सोहळा

84
0
पुणे | प्रतिनिधी — पुण्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज अधिकृतपणे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन येथे हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशांत जगताप यांच्यासोबत पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारीही काँग्रेसमध्ये दाखल झाले.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश हा काँग्रेससाठी बळ देणारा मानला जात आहे. अनेक पक्षांकडून आलेल्या ऑफर नाकारून, वैचारिक भूमिकेशी प्रामाणिक राहत त्यांनी काँग्रेसचा मार्ग स्वीकारल्याने राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा होत आहे.
“काँग्रेस म्हणजे विचारांची लढाई” – हर्षवर्धन सपकाळ
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा आणि काँग्रेस पक्ष हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. राजकारण हे विचारांवर आधारित असते, आणि काँग्रेस पक्ष ही वैचारिक लढाई निष्ठेने व निकराने लढत आहे.”
ते पुढे म्हणाले की, आज काही पक्ष केवळ सत्ता, पैसा आणि तमाशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र काँग्रेसची विचारधारा देशाला व समाजाला दिशा देणारी आहे. “प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेसच्या प्रशांत महासागरात प्रवेश केला आहे,” अशा शब्दांत त्यांनी स्वागत केले.
जातीयवादी राजकारणाला नकार, पुरोगामी विचारांशी निष्ठा
प्रशांत जगताप यांनी जातीयवादी आणि मनुवादी विचारधारेशी कोणतीही तडजोड न करता काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. ते छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी निष्ठावान नेते असून, विचारांसाठी पक्षनिष्ठा जपणारे नेतृत्व आज दुर्मिळ असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
“लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसची वाट निवडली. असे नेते असतील तर २०२९ आपलेच असेल,” असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
टिळक भवनमध्ये काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार
या कार्यक्रमात काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित ४१ नगराध्यक्षांचा जाहीर सत्कार करण्यात आला. टिळक भवनमध्ये पार पडलेल्या या समारंभात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व माजी मंत्री नसीम खान, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, एआयसीसी सचिव बी. एम. संदीप, आमदार हेमंत ओगले, वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, सरचिटणीस भाऊसाहेब आजबे, धनंजय शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
“विपरीत परिस्थितीत मिळालेले यश उल्लेखनीय”
यावेळी सांगण्यात आले की, नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसचे १००६ नगरसेवक निवडून आले असून १०० नगरपालिकांमध्ये काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. सत्ताधारी पक्षांकडून पैशांचा, यंत्रणांचा आणि दबावाचा वापर झाल्याचा आरोप करताना, “अशा प्रतिकूल परिस्थितीतही काँग्रेसचा कार्यकर्ता डगमगला नाही आणि आज काँग्रेस राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उभा राहिला आहे,” असे मत व्यक्त करण्यात आले.
४१ नगराध्यक्ष ही संख्या मोठी नसली, तरी आजच्या राजकीय परिस्थितीत हे यश अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले. विजयी उमेदवारांबरोबरच पराभूत उमेदवारांचेही निर्धाराने लढा दिल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.