पुणे | प्रतिनिधी — गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि राज्यात जाणवणारी थंडी पुढील काही दिवस कायम राहणार असून, नववर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात गारठा आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. त्यामुळे यंदाचा हिवाळा अधिक काळ टिकणार असून, पुणेकरांना सुखद पण बोचरी थंडी अनुभवायला मिळणार आहे.
उत्तरेकडून वाहणारे थंड वारे, स्वच्छ आकाश आणि कोरडे हवामान यामुळे वातावरणातील गारवा वाढला आहे. मागील काही दिवसांत पुणे शहर आणि परिसरातील किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवले गेले आहे. यामुळे सकाळी आणि रात्री थंडीचा कडाका अधिक जाणवत असून, नागरिकांनी उबदार कपड्यांचा आधार घ्यायला सुरुवात केली आहे.
रविवार, २१ डिसेंबर रोजी हवेली तालुक्यात या हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान ६.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्याआधीही किमान तापमान ७ अंशांपर्यंत घसरले होते. गुरुवारी पुणे शहरात ९.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. या पार्श्वभूमीवर सध्याची थंडी वर्षअखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ अनुपम कश्यपी यांच्या माहितीनुसार, भारतीय हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये किमान रात्रीचे तापमान या आठवड्यात (वर्षअखेरपर्यंत) जवळपास स्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही दिवस तापमानात फारशी घसरण होणार नाही. मात्र, उत्तरेकडून जोरदार थंड वारे वाहू लागल्यास नववर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि पूर्व भारतात किमान तापमान पुन्हा घसरण्याची दाट शक्यता आहे.
या बदलत्या हवामानामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात दिवसा तापमानातही घट होऊ शकते. त्यामुळे सकाळी धुके, थंड वारे आणि रात्री अधिक गारवा जाणवण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींची काळजी घ्यावी, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे. एकूणच, पुणेकरांसाठी नववर्षाची सुरुवात थंडीच्या कडाक्याने होणार असून, हिवाळ्याचा आनंद लुटतानाच आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे ठरणार आहे.