पिंपरी | दि. २६ डिसेंबर २०२५ — पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वीर बाल दिवसानिमित्त शीख इतिहासातील अजरामर शौर्याचे प्रतीक असलेल्या बाबा जोरावर सिंह जी आणि बाबा फतेह सिंह जी यांच्या स्मरणार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या वीर बालकांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी या वीर बालकांच्या त्याग, धैर्य आणि राष्ट्रप्रेमाला स्मरण करत मौन पाळून आदरांजली वाहिली.
कार्यक्रमादरम्यान वक्त्यांनी बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या बलिदानाचा इतिहास उलगडून सांगितला. लहान वयातही अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धैर्य, धर्मनिष्ठा आणि देशासाठी सर्वोच्च बलिदान देण्याची तयारी या वीर बालकांकडून आजच्या पिढीने प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त करण्यात आले. अशा महापुरुषांच्या स्मृती जपणे आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे ही समाजाची जबाबदारी असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
वीर बाल दिवसाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड महापालिकेने देशभक्ती, शौर्य आणि मूल्यांची जाणीव नागरिकांमध्ये रुजवण्याचा संदेश दिला. विशेषतः युवा पिढीने या इतिहासातून प्रेरणा घेऊन समाज व राष्ट्रहितासाठी कार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.