आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांकडून कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार, दहशत अथवा गुन्हेगारी घटना घडू नयेत यासाठी शहरभर नाकाबंदी, संशयितांची तपासणी व सातत्यपूर्ण गस्त सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी केलेल्या एका महत्त्वाच्या कारवाईत रेकॉर्डवरील आरोपीला गावठी बनावटीच्या पिस्टलसह जेरबंद करण्यात आले आहे. या कारवाईमुळे निवडणूक काळात संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याने परिसरात नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त करण्यात येत आहे.
संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड व पोलीस अंमलदार यांचे पथक गोंधळेनगर परिसरात निवडणूक काळातील कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पोलीस अंमलदार कुंडलीक केसकर व तुकाराम झुंजार यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस रेकॉर्डवर असलेला आरोपी रोहन राजकुमार गायकवाड (वय २० वर्षे, रा. गोंधळेनगर, हडपसर, पुणे) हा अवैधरित्या शस्त्र बाळगून परिसरात वावरत असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस असा एकूण सुमारे ५१,२०० रुपये किमतीचा शस्त्रसाठा मिळून आला.
या प्रकरणी हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर १०९९/२०२५ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)(३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी करीत आहेत. आरोपीविरोधात यापूर्वीही गुन्ह्यांची नोंद असल्याने त्याच्या पार्श्वभूमीचा सखोल तपास करण्यात येत आहे.
ही यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ६ डॉ. सागर कवडे तसेच मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्री. अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय मोगले व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे यांच्या सूचनांनुसार तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी ही कारवाई यशस्वी केली.
पुणे शहरात निवडणूक काळात अशा प्रकारच्या बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला असून नागरिकांनीही कोणतीही संशयास्पद माहिती पोलिसांना तात्काळ कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.