Home Breaking News वाघोलीत वाहनचोरांवर पोलिसांची मोठी कारवाई; बाहेर जिल्ह्यातून येऊन चोरी करणारे दोन सराईत...

वाघोलीत वाहनचोरांवर पोलिसांची मोठी कारवाई; बाहेर जिल्ह्यातून येऊन चोरी करणारे दोन सराईत आरोपी जेरबंद, तीन गुन्हे उघड

पुणे शहर व परिसरात वाढत चाललेल्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांकडून सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी उत्कृष्ट तपास करत दोन सराईत वाहनचोर आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तीन वेगवेगळे वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे.
दिनांक ०५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास साई सत्यम पार्क, लेन नं. ३, वाघोली येथून फिर्यादी यांची रॉयल एनफिल्ड बुलेट दुचाकी पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी वाघोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ६९६/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना वाघोली पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार अमोल सरतापे व सुनील कुसाळकर यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत वाघोली ते शेवगाव-नेवासा रोडवरील तब्बल १७० ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सखोल तपासातून वाहन चोरी करणारे सराईत आरोपी निष्पन्न झाले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे १) रामेश्वर अंकूश धनगर (वय २८ वर्षे, रा. गणेशनगर, पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) व २) आजीनाथ संभाजी माळी (वय २२ वर्षे, रा. सोनी सांगवी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) अशी आहेत. हे दोन्ही आरोपी बाहेर जिल्ह्यातून येऊन पुणे शहर व परिसरात वाहन चोरीचे गुन्हे करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
या आरोपींकडून चोरीस गेलेली रॉयल एनफिल्ड बुलेट दुचाकी तसेच इतर दोन चोरीच्या दुचाकी असा एकूण सुमारे १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींकडून खालील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत –
  1. वाघोली पोलीस स्टेशन गु.र.नं. ६९६/२०२५
  2. रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण गु.र.नं. ८१/२०२५
  3. छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३१७/२०२५
या यशस्वी कारवाईमुळे पुणे शहरासह ग्रामीण भागात वाहन चोरी करणाऱ्या टोळ्यांवर मोठा आघात बसला असून नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ७ श्री. सोमय मुंडे तसेच मा. सहाय्यक पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग श्री. नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन श्री. युवराज हांडे यांच्या सूचनांनुसार तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी ही कारवाई यशस्वी केली.
पुणे शहरात वाहन चोरीविरोधात अशीच कठोर मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावीत व कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.