पुणे शहरात आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. याच अनुषंगाने गुन्हे शाखा, युनिट-०३ पुणे शहरने केलेल्या एका महत्त्वाच्या कारवाईत विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी पिस्टल व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट-३ कडील सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक मुकुंद तारु व पोलीस अंमलदार हे वरिष्ठांच्या आदेशानुसार सिंहगड रोड, नांदेड सिटी व न-हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी सुरू असताना पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे व तुषार किंद्रे यांना गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, एक विधीसंघर्षित बालक अवैधरित्या बेकायदेशीर गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगून मते प्लॉट, न-हे धायरी रोड, न-हे, पुणे येथे थांबलेला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. माहिती मिळताच तात्काळ पोलिस पथकाने त्या ठिकाणी धाव घेत सापळा रचला आणि अत्यंत शिताफीने संबंधित विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले.
तपासणीदरम्यान त्या बालकाकडून एक गावठी पिस्टल व तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. ही शस्त्रे अवैधरित्या व बेकायदेशीररीत्या बाळगल्याचे निष्पन्न झाल्याने पुढील कायदेशीर कारवाईसाठी सदर विधीसंघर्षित बालकाला न-हे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात दहशत माजवण्याचा किंवा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्याचा धोका टळला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही उल्लेखनीय कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) पुणे शहर श्री. निखिल पिंगळे, तसेच मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) पुणे शहर श्री. विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. युनिट-३ मधील अधिकारी व पोलीस अंमलदारांच्या सतर्कतेमुळे व समन्वयामुळे ही कारवाई यशस्वी झाली आहे. पुणे पोलिसांकडून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असून, बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.