पुणे शहरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः कोरेगाव भीमा येथे जयस्तंभास अभिवादनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा घेत, तसेच बसस्टॉप, सार्वजनिक ठिकाणे व इतर गर्दीच्या परिसरात महिलांना लक्ष्य करून मंगळसूत्र चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी अखेर पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-६ च्या जाळ्यात अडकली आहे. या कारवाईमुळे पुणे शहरातील अनेक प्रलंबित गुन्हे उघडकीस आले असून नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
महिलांवरील अशा प्रकारच्या चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-६ कडून सातत्याने संशयित आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते. पोलीस निरीक्षक श्री. वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व पथकातील पोलीस अंमलदार कारखेले, मुंडे, साळवे, ताकवणे, व्यवहारे यांनी गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यांचे संकलन करून तपास अधिक तीव्र केला.
दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपी १) सुभाष चंद्रकांत जाधव (वय ३९, रा. शिरापुर धुमाळ, ता. शिरूर, जि. बीड) व २) लहु संतराम गायकवाड (वय ३०, रा. रायमोह, ता. शिरूर, जि. बीड) यांना ताब्यात घेतले. कौशल्यपूर्ण चौकशीत त्यांच्याकडून एकूण १६७ ग्रॅम वजनाचे सुमारे २० लाख ४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
तपासादरम्यान या टोळीने पुणे शहरातील विविध भागात केलेले एकूण सहा मंगळसूत्र चोरीचे गुन्हे उघडकीस आले. यामध्ये वाघोली, लोणीकंद, लोणीकाळभोर, हडपसर व स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्ह्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गर्दीच्या ठिकाणी महिलांना लक्ष्य करून क्षणात मंगळसूत्र हिसकावून पसार होणे हीच या टोळीची कार्यपद्धती होती.
या कारवाईमुळे अनेक पीडित महिलांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेबाबत पुणे पोलिसांची ठाम भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर आणखी कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, तसेच मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्हे शाखा युनिट-६ मधील सर्व अधिकारी व अंमलदारांच्या समन्वयामुळे ही कारवाई यशस्वी ठरली आहे.