Home Breaking News चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगलेला व पॅरोलवरून फरार सराईत चोर बाणेर पोलिसांच्या जाळ्यात,...

चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगलेला व पॅरोलवरून फरार सराईत चोर बाणेर पोलिसांच्या जाळ्यात, मुंबईतून अटक

60
0
बाणेर पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या चोरीच्या प्रकरणात शिक्षा भोगलेला आणि दुसऱ्या चोरीच्या गुन्ह्यात पॅरोलवरून फरार असलेल्या सराईत आरोपीला बाणेर पोलिसांनी अटक करून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली असून, सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांची कडक भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी बाणेर पोलीस स्टेशन येथे फिर्यादीने तक्रार दाखल केली होती. फिर्यादीच्या दुकानात काम करणारा नौकर निलेश विष्णू कदम याने दुकानातील कॅश बॉक्समधील रोख १५ हजार रुपये तसेच दोन मोबाईल फोन असा एकूण २९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. या तक्रारीच्या आधारे बाणेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली की, सदर आरोपी हा कमी पगारावर दुकाणांमध्ये नोकरीला राहून त्याच ठिकाणी चोरी करून फरार होण्याची सवय असलेला सराईत गुन्हेगार आहे. आरोपी निलेश विष्णू कदम याच्याविरोधात विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर १९५/२०२३ भारतीय दंड संहिता कलम ३८० अंतर्गत गुन्हा दाखल असून, त्या प्रकरणात त्याला शिक्षा देखील झाली आहे.
तसेच आरोपीविरोधात कणकवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ९८/२०२३ भादंवि कलम ३८०, ४५७, ५११ अन्वये गुन्हा दाखल असून, त्या गुन्ह्यात तो पॅरोल रजेवरून फरार असल्याची माहिती तपासात समोर आली. यामुळे पोलिसांसमोर आरोपीचा शोध घेणे अधिक आव्हानात्मक बनले होते.
तपासात मिळालेल्या विश्वासार्ह बातमीदाराच्या माहितीनुसार आरोपी मुंबईत कुठेतरी काम करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, बाणेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत यांनी तातडीने तपास पथक मुंबई येथे रवाना केले. सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव, पोलीस अंमलदार आहेर व शिंगे यांच्या पथकाने मुंबईत सखोल शोध घेत दि. १० डिसेंबर २०२५ रोजी आरोपी निलेश विष्णू कदम (वय ३१ वर्षे, रा. मु.पो. दुरशेट, पोस्ट खांबेवाडी, ता. खालापूर, जि. रायगड) याला अटक केली. पोलिस तपासात आरोपीने चोरी केलेले मोबाईल फोन बाहेर राज्यात विक्री केल्याचे निष्पन्न झाले असून, चोरीच्या मुद्देमालाच्या पुढील तपासाची कार्यवाही सुरू आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार आहेर करीत आहेत.
ही संपूर्ण कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परि. ४ पुणे शहर श्री. चुलूमुला रजणीकांत, तसेच मा. सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभाग पुणे शहर श्री. विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग यांच्यासह तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव, गणेश रायकर, पोलीस अंमलदार बाबासाहेब आहेर, गणेश गायकवाड, प्रदीप खरात, शरद राऊत, गजानन अवातिरक, प्रविण गव्हाणे यांच्या मेहनतीमुळे ही कारवाई यशस्वी ठरली आहे.