पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने पुन्हा एकदा प्रभावी कारवाई करत गुन्हेगारी विश्वाला मोठा धक्का दिला आहे. देशी बनावटीची दोन गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस बेकायदेशीररित्या बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यातील एक आरोपी मागील सात महिन्यांपासून फरार होता.
दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी खंडणीविरोधी पथक क्रमांक २, गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार आझाद पाटील व पवन भोसले यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीनुसार लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी शुभम कैलास कामठे (वय ३०, रा. कदम वाक वस्ती, लोणी काळभोर) हा शस्त्र बाळगत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार सापळा रचून आरोपी शुभम कामठेला ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान त्याच्या कमरेला एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस सापडले. त्याच्यासोबत असलेल्या शुभम श्रीमंत रसाळ (वय १९, रा. पावर हाऊस शेजारी, फुरसुंगी) याच्याकडूनही एक गावठी पिस्टल जप्त करण्यात आले. एकूण सुमारे ८०,५०० रुपये किमतीची शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.
या दोन्ही आरोपींविरुद्ध फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ४३६/२०२५ अंतर्गत भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपी शुभम कैलास कामठे याच्यावर पुणे शहरात यापूर्वीच आठ गंभीर गुन्हे दाखल असून तो मागील सात महिन्यांपासून फरार होता.
ही यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे, तसेच मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. खंडणीविरोधी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी दाखवलेली तत्परता व धाडसामुळे संभाव्य गुन्हे रोखण्यात मोठे यश मिळाले आहे. पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलीस सातत्याने कठोर पावले उचलत असून, अशा कारवायांमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.