Home Breaking News लक्ष्मीनगर पोलिसांची मोठी कारवाई; हातभट्टी गाळण करून गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांचा...

लक्ष्मीनगर पोलिसांची मोठी कारवाई; हातभट्टी गाळण करून गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यांचा पूर्ण नायनाट

पुणे शहरात अवैध दारू व्यवसायावर कडक कारवाईचा धडाका सुरू असतानाच लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने हातभट्टी गाळण करून गावठी दारू तयार करणाऱ्या ठिकाणांवर मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले असून परिसरातील बेकायदेशीर दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी शहरातील अवैध हातभट्टी दारू व्यवसायावर प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांच्या अनुषंगाने लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार गद्दे व चव्हाण यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीनुसार नाईकनगर, येरवडा (स. नं. १४) परिसरात काही इसम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मोठ्या प्रमाणावर गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन तसेच तयार गावठी दारू साठवून ठेवत असल्याचे उघड झाले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन, सहायक पोलीस निरीक्षक सावंत, सहायक पोलीस निरीक्षक नंदनवार व इतर पोलीस अंमलदारांनी घटनास्थळी धाड टाकली. तपासादरम्यान तीन वेगवेगळ्या मोकळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गावठी दारू व कच्चे रसायन आढळून आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने घटनास्थळीच अंदाजे १००० लिटर कच्चे रसायन व साहित्य पूर्णपणे नष्ट करण्यात आले. यासोबतच परिसरात शोधमोहीम राबवून १० ते १५ हातभट्टी शोधून त्या तोडून टाकण्यात आल्या. या कारवाईमुळे येरवडा व आसपासच्या परिसरात चालणाऱ्या अवैध दारू धंद्याला मोठा आळा बसला आहे.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ-०४ श्री. चिलुमुला रजनिकांत, तसेच मा. सहायक पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्री. सुनील जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन श्री. रविंद्र कदम यांच्या सूचनांनुसार सहायक पोलीस निरीक्षक सावंत, नंदनवार, तसेच पोलीस अंमलदार कांबळे, गडमवाड, अहिवळे, निलख, गायकवाड, बेलके, चुकेवाड, ससाने, होळकर व टोपे यांनी ही यशस्वी कारवाई केली. या कठोर कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, अवैध दारू व्यवसायामुळे होणाऱ्या सामाजिक व आरोग्यविषयक दुष्परिणामांवर नियंत्रण मिळवण्याच्या दिशेने पुणे पोलीस ठोस पावले उचलत असल्याचे स्पष्ट झाले आहे.