पुणे शहरात जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वानवडी पोलीस स्टेशनने अत्यंत प्रभावी कारवाई करत रस्त्याने जाणाऱ्या एका वयोवृद्ध नागरिकाला निर्जनस्थळी अडवून लूट करणाऱ्या आरोपीस जेरबंद केले आहे. ही घटना शहरात वाढत चाललेल्या रस्तालुटीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत दिलासादायक मानली जात आहे.
दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी मधुबन सोसायटीकडून हिलसाईड अपार्टमेंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर, रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया परिसरात टेकडीजवळील निर्जन ठिकाणी चार अनोळखी इसमांनी एका जेष्ठ नागरिकास अडवले. आरोपींनी त्यांना हाताने मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सुमारे १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने ओढून घेतली व मोटारसायकलवरून फरार झाले होते. या प्रकरणी पीडित वयोवृद्ध नागरिकांनी दिलेल्या फिर्यादीवरून वानवडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक ५०६/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०९(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच वानवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तात्काळ तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित आरोपींचा माग काढण्यात आला. दरम्यान, दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी पोलीस अंमलदार विष्णु सुतार, विठ्ठल चोरमले व अभिजित चव्हाण यांना गुप्त बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यातील एक आरोपी गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळील ओढ्यावरील छोट्या पुलाजवळ, निर्जन ठिकाणी अॅक्टीवा वाहनावर कोणाची तरी वाट पाहत थांबलेला होता. या माहितीच्या आधारे वानवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांनी पथकासह घटनास्थळी सापळा रचून संशयितास शिताफीने ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपीने आपले नाव उमर नूर खान (वय १८ वर्षे, रा. नवाधिश पार्क, कोंढवा, पुणे) असे सांगितले. त्याच्या अंगझडतीत पँटच्या खिशातून १५ ग्रॅम वजनाची सोन्यासारखी दिसणारी चैन सापडली. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याने संबंधित सोन्याची चैन व अॅक्टीवा दुचाकी जप्त करून त्याला अटक करण्यात आली आहे.
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०५ श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग श्रीमती नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भाऊसाहेब पाटील, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी समन्वयाने केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशस्वी कारवाईमुळे जेष्ठ नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास वाढला असून, रस्तालुटीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलीस सतर्क असल्याचा ठाम संदेश समाजात गेला आहे.