पुणे | आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला असून, ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी नगरसेवक मुख्तार शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे पुण्यातील राजकीय समीकरणांमध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुख्तार शेख यांच्यासोबत त्यांचे पुत्र विकार अहमद मुख्तार शेख यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विकार शेख हे आगामी महापालिका निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार मानले जात असून, या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे.
मुख्तार शेख हे पुणे शहर काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष राहिले असून, शहरातील अल्पसंख्याक समाजाचा प्रमुख चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी यापूर्वी पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणूनही काम केले आहे. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसविरोधात बंडखोरी केल्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर हे निलंबन रद्द करण्यात आले होते; तरीही अंतर्गत नाराजी कायम असल्याचे बोलले जात होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बोलताना मुख्तार शेख यांनी काँग्रेस नेतृत्वावर गंभीर आरोप केले. “काँग्रेस पक्षाने सातत्याने मुस्लिम समाजाला केवळ मतपेढीपुरतेच मर्यादित ठेवले. निर्णय प्रक्रियेत आणि नेतृत्वाच्या पातळीवर योग्य संधी देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत गेला,” असा आरोप त्यांनी केला.
आगामी १५ जानेवारी रोजी पुणे महापालिकेची निवडणूक होत असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. अशा महत्त्वाच्या टप्प्यावर हा पक्षप्रवेश झाल्याने काँग्रेससाठी ही बाब चिंताजनक मानली जात आहे. दुसरीकडे, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा प्रवेश अल्पसंख्याक समाजात प्रभाव वाढवणारा ठरू शकतो, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. या प्रवेशामुळे पुण्यातील काँग्रेस पक्षातील गळती आणखी वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.