Home Breaking News T20 World Cup 2026: टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व, गिल बाहेर,...

T20 World Cup 2026: टीम इंडियाची घोषणा; सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व, गिल बाहेर, अक्षर पटेल उपकर्णधार

नवी दिल्ली | आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय क्रिकेट संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. आज (२० डिसेंबर) झालेल्या निवड समितीच्या बैठकीनंतर बीसीसीआयने पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली.
या पत्रकार परिषदेला बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव उपस्थित होते. यावेळी संघाची घोषणा करताना अनेक धक्कादायक आणि महत्त्वाचे निर्णय समोर आले.
 सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व, अक्षर पटेल उपकर्णधार
टीम इंडियाची धुरा पुन्हा एकदा सूर्यकुमार यादव यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली असून, आक्रमक खेळशैली आणि आधुनिक टी-२० क्रिकेटची सखोल समज असलेला कर्णधार म्हणून त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
विशेष बाब म्हणजे अक्षर पटेलला प्रथमच उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे, जो संघातील संतुलन राखणारा महत्त्वाचा अष्टपैलू ठरणार आहे.

शुभमन गिलचा पत्ता कट; मोठा निर्णय
या संघातील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे शुभमन गिलला संघात स्थान न मिळणं. सध्या गिल अपेक्षित फॉर्ममध्ये नसल्याने निवडकर्त्यांनी हा कठोर निर्णय घेतल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. हा निर्णय अनेक क्रिकेट चाहत्यांसाठी आश्चर्यकारक ठरला आहे.
 इशान किशन, रिंकू सिंगला संधी; जितेश शर्मा बाहेर
सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेतील स्फोटक कामगिरीचे फळ इशान किशनला मिळाले असून तो यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून संघात परतला आहे.
तर रिंकू सिंगची पुनरागमन ही मधल्या फळीसाठी मोठी जमेची बाजू मानली जात आहे. फिनिशर म्हणून रिंकू महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दुसरीकडे, जितेश शर्माला संघात स्थान मिळू शकले नाही, हे देखील लक्षवेधी ठरले आहे.
 अनुभवी आणि संतुलित संघ
संघात अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, तसेच फिरकीमध्ये कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश करण्यात आला आहे.
हार्दिक पांड्या, शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदर हे अष्टपैलू खेळाडू संघाला अतिरिक्त ताकद देणार आहेत.
 टी-२० विश्वचषक २०२६ साठी टीम इंडियाचा संघ
  • सूर्यकुमार यादव (कर्णधार)
  • अभिषेक शर्मा
  • संजू सॅमसन (यष्टीरक्षक)
  • तिलक वर्मा
  • हार्दिक पांड्या
  • शिवम दुबे
  • इशान किशन (यष्टीरक्षक)
  • अक्षर पटेल (उपकर्णधार)
  • रिंकू सिंग
  • जसप्रीत बुमराह
  • हर्षित राणा
  • अर्शदीप सिंग
  • कुलदीप यादव
  • वरुण चक्रवर्ती
  • वॉशिंग्टन सुंदर
 भारताचे सामने कधी आणि कुठे?
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताला गट ‘अ’ मध्ये स्थान देण्यात आले असून, तुलनेने हा गट सोपा मानला जात आहे. भारतासोबत पाकिस्तान, अमेरिका, नामिबिया आणि नेदरलँड्स हे संघ गटात आहेत.
भारताचे सामने:
  •  ७ फेब्रुवारी – भारत vs अमेरिका | मुंबई
  •  १२ फेब्रुवारी – भारत vs नामिबिया | दिल्ली
  •  १५ फेब्रुवारी – भारत vs पाकिस्तान | कोलंबो
  •  १८ फेब्रुवारी – भारत vs नेदरलँड्स | अहमदाबाद
 मागील विश्वचषकातील हे खेळाडू संघाबाहेर
टी-२० विश्वचषक २०२४ च्या विजयी संघातील ७ खेळाडू २०२६ च्या संघात नाहीत.
  • रोहित शर्मा
  • विराट कोहली
  • रवींद्र जडेजा
    (या तिघांनी निवृत्ती जाहीर केली होती)
याशिवाय,
  • ऋषभ पंत
  • मोहम्मद सिराज
  • युजवेंद्र चहल
  • यशस्वी जायसवाल
यांनाही नव्या संघातून डच्चू देण्यात आला आहे.
 सलग दुसऱ्या जेतेपदावर भारताची नजर
शेवटचा टी-२० विश्वचषक जिंकलेल्या टीम इंडियाकडून सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावण्याची मोठी अपेक्षा आहे. तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल असलेला हा संघ भारताला पुन्हा एकदा विश्वविजेता बनवू शकतो, असा विश्वास क्रिकेट जाणकार व्यक्त करत आहेत.