पिंपरी-चिंचवड | खेड तालुका – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील खेड तालुक्यातील महालुंगे MIDC परिसरात गुरुवारी सकाळी एक अत्यंत भीषण अपघात घडला. प्रवासी रिक्षा आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने रिक्षा अक्षरशः चेंदामेंदा झाली. या भीषण अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात इतका भीषण होता की रिक्षा लोखंडाच्या ढिगाऱ्यात रूपांतरित झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मृत व जखमींची ओळख
या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे राम सुंदर राम खिलावन साखेड (वय ४७, रा. महालुंगे, मूळ मध्यप्रदेश) आणि पिंटू राजन बिहारा (वय २५, रा. महालुंगे, मूळ ओडिशा) अशी आहेत.
तर जखमींमध्ये रिक्षाचालक रोहिदास सीताराम आडे (वय ३६, रा. खरबवाडी) आणि प्रवासी सागर मोहन मोहंती (वय २६, रा. खरबवाडी) यांचा समावेश आहे.
कसा घडला अपघात?
पोलीस सूत्रांनुसार, प्रवासी घेऊन जाणारी रिक्षा चाकणकडून महालुंगे गावाच्या दिशेने औद्योगिक क्षेत्रातून जात होती. यावेळी समोरून येणाऱ्या टेम्पोने रिक्षेला जोरदार धडक दिली. धडकेचा वेग आणि तीव्रता इतकी होती की रिक्षेचा सांगाडाच उध्वस्त झाला.
बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर संताप
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. चाकण परिसरात बेकायदेशीर प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नियमानुसार रिक्षामधून केवळ तीन प्रवासी वाहून नेण्याची परवानगी असताना, अनेकदा रिक्षांमध्ये सहा ते सात प्रवासी कोंबून नेले जात असल्याचे चित्र रोजच दिसते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
अशा बेजबाबदार वाहतुकीमुळेच वारंवार जीवघेणे अपघात घडत असून, प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
पोलिस तपास सुरू
या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, टेम्पो चालकाची चौकशी करण्यात येत आहे. अपघाताचे नेमके कारण, वेग, नियमांचे उल्लंघन आणि प्रवासी क्षमतेबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा अपघात केवळ एक घटना नसून, औद्योगिक परिसरातील वाहतूक व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आणणारा ठरला आहे.




